स्वारगेट बस स्थानक तरूणीवर बलात्कार, अजितदादाही संतापले, आयुक्तांना निर्देश घटना क्लेशदायक, संतापदायक

0

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. मात्र तरीही बलात्कासारखा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिम्मत झाली. स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी स्वारगेटची घटना

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, मी पण पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेत

मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

आरोपीच्या शिक्षेसाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.