पंचशील म्हणजे सुखी, आनंदी व आदर्श जीवन जगण्याचा मार्ग होय – बौद्धाचार्य सचिन मोहिते

0

मुंबई दि. ५ ( रामदास धो. गमरे) “त्रिसरण पंचशील ही आरती, उपासना, पूजाविधी, आराधना नाही तर ती जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे, बाबासाहेब म्हणतात पंचशील हे सर्व सुखांचे उगमस्थान आहे, पंचशीलांना पाली भाषेमध्ये शिखा पदम म्हणजे शिकवणीचे पद असे म्हटले आहे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात पंचशिलांना विशुद्धीचा मार्ग असे म्हटले आहे. आजच्या संघर्षमय जीवनात काही लोक स्वतःचे जीवन सुखमय करण्यासाठी काही ना काही अकुशल कर्म करत असतात दुसऱ्यांना कष्ट देऊन हिंसा, व्याभिचार, चोरी, भ्रष्टाचार, लबाडी, खोटे बोलून फसवणूक करून स्वार्थ साधतात त्यात सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात तेच सुखाचे साधन समजतात, नशापान करून त्यातच आनंद मानतात परंतु ही लोक ज्या मार्गाचा अवलंब करतात त्यांना खरोखर सुखाचा लाभ होतो का? तर नाही, निसर्ग नियमानुसार त्यांना त्यांचे परिणाम भोगावला मिळतात परंतु कोणी एखाद्या दंडाच्या भीतीची वचक समाजात असण्यापेक्षा स्वतःच्या शिलाचा, आदराचा वचक असला पाहिजे. पंचशीलातील पाच तत्व ही आपल्या संविधानात ही घेतली गेली आहेत महिला अत्याचार, भ्रष्टाचार, हत्या, फसवाफसवी, खोटे बोलणे यांना निर्बंध घालणारे बरेचशे कायदे संविधानाच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत आणि आपण त्याचे पालन करतो म्हणजेच पंचशील व समता, बंधुता, स्वातंत्र्य, मैत्री यांचा अंगीकार करतो म्हणून पंचशील म्हणजे सुखी आनंदी व आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे” असे प्रतिपादन ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प गुंफत असताना “त्रिसरण पंचशील” या विषयावर बोलत असताना बौद्धाचार्य सचिन मोहिते यांनी केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet app द्वारे ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, सदर चौथ्या पुष्पाच्या प्रसंगी बौद्धजन सहकारी संघाचे विश्वस्त पांडुरंग गमरे व परिवारास पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते पूजाविधी संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे तालुका सरचिटणीस संदेश गमरे यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी तब्येत ठीक नसताना ही कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत प्रास्ताविक सादर केले त्यात त्यांनी “आपण आम्हाला साथ देता म्हणूनच आम्ही यशस्वीपणे कार्यक्रम व उपक्रम सादर करू शकलो अशीच आपली साथ राहिल्यास धम्माचा प्रचार व प्रसार घराघरांत पोहोचेल.” असे नमूद करीत सर्वांना मंगलकामना दिल्या.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सदर कार्यक्रमास गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच विश्वस्त पांडुरंग गमरे, आदर्श बौद्धाचार्य व्याख्याते सचिन मोहिते गुरुजी, गाव व मुंबई शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, उपासक, उपासिका, हितचिंतक व उपस्थितांचे आभार मानून सरचिटणीस संदेश गमरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.