आर. के. ग्रुप फाउंडेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २ (अधिराज्य) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०५ वा जयंती उत्सव आर. के. ग्रुप फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रवींद्र कुंचीकोरवे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी जय मातंग युवक संघाचे संस्थापक किशोर शिंदे आणि कार्याध्यक्ष दीपकभाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन आर. के. ग्रुपच्या संतोष जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात व लाघवी शैलीत केले. तद्नंतर आर. के. ग्रुप फाउंडेशनच्या वतीने “अण्णाभाऊ यांचे जीवन आणि कार्य” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग गटक्रमांक १३ चे गटप्रमुख, कवी, लेखक, पत्रकार, विभागातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापून व शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी आपला वाढदिवस साजरा करून सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करताना “आर. के. ग्रुप फाउंडेशन व जय मातंग युवक संघ यांनी मला बोलावून माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, आज अण्णाभाऊ साठे यांचा १०५ वा जयंतीमहोत्सव, अण्णाभाऊ म्हणजे एक महान लेखक, सच्चा तत्वनिष्ठ कार्यकर्ता, जगात दोन प्रकारचे लेखक असतात एक भरपेट खाऊन ढेकर देत स्वप्नविलास लिहिणारे तर दुसरे उपाशीपोटी आतडीला पीळ मारीत भुकेच्या आगीत तावूनसलाखून निघालेले अनुभवाच्या कसोटीवर सत्य लिहिणारे लेखक, त्यातील अनुभवाच्या कसोटीवर जळजळीत वास्तव लिहिणारे लेखक हे खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा असतात, अण्णाभाऊ साठे हे देखील त्याच पठडीतले जळजळीत व शाश्वत सत्य मांडणारे लेखक, अण्णाभाऊंनी तळागाळातील शोषित, पीडित, वंचित, कामगार वर्गाच्या व्यथा आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून खऱ्या अर्थाने त्यांच्या मूक व्यथाना वाचा फोडली, त्यांच्या धारदार लेखणीने बहुजनांच्या नसानसांतील थंड रक्ताला गरमी मिळाली व एका नवीन विद्रोही क्रांतीची सुरवात झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे, कामगारांचे प्रश्न घेऊन अण्णाभाऊ एकदा बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले असता काही कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत लेखक, साहित्यिक अण्णाभाऊ साठे आले आहेत असं सांगताच बाबासाहेब म्हणाले की ‘अण्णाभाऊ आणि त्यांची धारदार लेखणी माझ्या चांगलीच परिचयाची आहे आणि हे नुसते कवी, साहित्यिक नसून तर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत’ तेव्हाच बाबासाहेबांनी दिलेली ‘लोकशाहीर’ ही पदवी अण्णाभाऊंच्या नावासमोर बिरुद म्हणून जोडली गेली” असे नमूद करीत अण्णाभाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून राजाभाऊ उर्फ रामदास धो. गमरेंनी सर्वांना जयंतीमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आर. के. ग्रुप फाउंडेशन, जय मातंग युवक संघ व बौद्धजन पंचायत समिती, शिवडी विभाग गटक्रमांक १३ या सर्वांनी एकत्रितपणे राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मंगलकामना व्यक्त केल्या.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सदर कार्यक्रमास आर. के. ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र कुंचीकोरवे, महेश भाऊ जाधव, दीपक भाऊ बनसोडे, संतोष जाधव तसेच जय मातंग युवक संघाचे किशोरभाऊ शिंदे, मलिक देवकुळे, समाजसेवक नंदू भालेराव, निखिल कांबळे, रोहित कांबळे, समर्थ सावंत, हर्ष घोलप, अमोल थोरात, अजय चांदणे, प्रदीप चांदणे, अभिषेक गायकवाड, इरफान शेख, निकेश कदम, बौद्धजन पंचायत समिती, शिवडी विभाग गट क्रमांक १३ चे कार्याध्यक्ष संतोष जाधव, सरचिटणीस संदीप मोहिते, सल्लागार नरेश मोहिते, माजी कोषाध्यक्ष आनंद मोहिते, शाखा क्रमांक ५७८चे उपाध्यक्ष प्रकाश तांबे, चिटणीस अनंत मोहिते, सरचिटणीस काशिनाथ पवार, खजिनदार राया सकपाळ, विभागीय कार्यकर्ते, सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून आर. के. ग्रुप फाउंडेशनच्या महेश जाधव यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन