दिवे घाटाच्या कुशीत वसलेला, १८व्या शतकातील इतिहास साठवून ठेवणारा मस्तानी तलाव पावसाळ्यात भरून वाहतोय… पण त्याच पावसाच्या थेंबांसोबत पर्यटकांची बेजबाबदार गर्दी, सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणारे खेळ, आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा घाण वास तलावाभोवती दरवळतोय.






पावसाचे पाणी भरलेलं असलं तरी व्यवस्थेचा कोरडेपणा स्पष्ट जाणवतो. ना कुंपण, ना सुरक्षारक्षक, ना स्वच्छता हे दृश्य पाहून वाटतं, जणू इतिहासानंच माघार घेतली आहे. दगडी कड्यावर बसून पाय पाण्यात लटकवणारी तरुण मंडळी, मोबाइलवर reels चा हव्यास, आणि डोळ्यांदेखत घडणारी सार्वजनिक विकृती… या सर्वामुळे तलावाची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळत आहे.
नवाब शादाब अली बहादूर पेशवा, खुद्द बाजीराव आणि मस्तानी यांचे नवव्या पिढीतील वंशज यांनी तलावाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर देत प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला. “हा तलाव मस्तानीबाईंनी शेतकऱ्यांसाठी पाण्याचा उपाय म्हणून सुचवला होता. आज त्याच तलावाला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय,” असं ते म्हणाले.
बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीही याच समस्येवर आवाज उठवत आहे. समितीचे कुंदन कुमार साठे म्हणतात, “ही केवळ तलावाची नव्हे, तर संपूर्ण इतिहासाची विटंबना आहे.”
पुरातत्त्व विभागाकडून जरी काही प्राथमिक कामे सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही बिकट आहे. ना रेलिंग पूर्ण झालंय, ना देखभाल नियमित आहे. तलावाजवळच दारू प्यायची, कचरा टाकायचा, आणि चार चाकी गाड्या अगदी कडेला नेऊन फोटो काढायचे, हे सारं दृश्य धोकादायक आणि अस्वस्थ करणारं आहे.
स्थानिक सांगतात, की यापूर्वीही येथे अपघात झाले आहेत, माणसं बुडालेली आहेत. पण प्रशासनाने एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही. हे पाहता, मस्तानी तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यात नव्हे, तर संवेदनशून्यतेच्या गर्तेतही बुडतोय.
ही वेळ आहे, जेव्हा प्रशासनाने जागं व्हायला हवं. कारण इतिहास जपणं ही केवळ पर्यटनाची जबाबदारी नाही, ती आपल्या संस्कृतीची सन्मान राखण्याची जबाबदारी आहे.











