पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या विविध भागांना भेटी देत थेट नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. “मोठमोठ्या प्रकल्पांपेक्षा नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
दैनंदिन समस्यांना प्राधान्य






गटार, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत अतिक्रमणे, पाण्याची गळती, साचलेले पाणी आणि स्वच्छता — या रोजच्या समस्या सुटल्याशिवाय “निवासयोग्य पुणे” हे स्वप्न साकार होणार नाही, असे राम म्हणाले.
स्वच्छ पुणे अभियान
पुण्यात स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत त्यांनी ‘स्वच्छ पुणे अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली. नागरिक, NGO आणि उद्योगपती यांच्या सहभागातून हे अभियान राबवले जाणार असून, कचरा संकलन आणि सफाई कामाचे थेट निरीक्षण करणारे ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ तयार केले जाणार आहे.
अतिक्रमणविरोधी मोहीम
ऑक्टोबरपासून शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू होणार आहे. ही मोहीम केवळ अतिक्रमण हटवण्यासाठी नव्हे तर ती पुन्हा होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था
पुण्यात नव्या आजारांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे सार्वजनिक आरोग्य हा प्राधान्यक्रम ठरेल. खासगी रुग्णालयांनी गरीब रुग्णांबाबत सहानुभूती दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ 10 टक्के विद्यार्थी आहेत. त्यामुळे लवकरच मॉडेल स्कूल सुरू करून त्या खासगी शाळांशी स्पर्धा करतील इतकं दर्जेदार शिक्षण देण्यात येईल, अशी योजना आहे.
प्रलंबित प्रकल्प आणि दीर्घकालीन योजना
मेट्रो, रिव्हरफ्रंट, JICAसारख्या प्रकल्पांवर काम सुरू असून ते वेळेत पूर्ण करणे हे राम यांचे ध्येय आहे. याशिवाय, विलीनीकरण झालेल्या गावांमध्ये ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर लाइन, काँक्रीट रस्ते यांची योजना आखली जात आहे.
आपत्ती व्यवस्थापन
पुणे शहरात २,४०० किमी रस्त्यांपैकी फक्त ३१८ किमीवरच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईन आहेत. त्यामुळे पूर, आगीच्या घटना आणि साथीच्या रोगांसाठी प्रभावी आपत्ती व्यवस्थापन उभे करण्यात येणार आहे.
सामर्थ्यवान प्रशासन
“चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी संरक्षण देईन आणि त्यांचे मनोबल उंचावेल,” असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी नियमित संवाद ठेवण्याचा संकल्प केला आहे.
पुणेकरांना संदेश
“मी तुमच्यासाठी आलो आहे. तुमच्या समस्या ऐकायला आणि सोडवायला तयार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन पुणे अधिक सुंदर, समावेशक आणि प्रतिसादक्षम बनवूया,” असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला.











