पुणे मेट्रोच्या लोखंडी साहित्याचा ढीग अजूनही मुठा नदीपात्रात; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही हलगर्जीपणा

0
2

खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असतानाही भिडे पुलाजवळील (डेक्कन) नदीपात्रात पुणे मेट्रो प्रकल्पाचे स्टील साहित्य अजूनही पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढल्याने गुरुवारी संध्याकाळपर्यंत ८७३४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या परिस्थितीतही नदीपात्रातील मेट्रोच्या कामाचे साहित्य तसंच असल्याने संभाव्य धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (महा-मेट्रो) जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे म्हणाले, “पावसाळ्याचा विचार करून ठेकेदाराला आधीच साहित्य हटवण्याचे निर्देश दिले होते. आता पुन्हा त्याला तत्काळ आणि प्राधान्याने हे साहित्य हटवण्याचे आदेश दिले जातील.”

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

महा-मेट्रो पादचारी पूल उभारत आहे, जो पेठ भागांमधून डेक्कन मेट्रो स्टेशनपर्यंत थेट प्रवेशासाठी असेल. या पुलाच्या माध्यमातून प्रवासी नारायण पेठ व अलका टॉकीज चौक परिसरात सहज जाऊ शकणार आहेत. परंतु, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढत असताना तिथे धातूच्या साहित्याचा ढीग असणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे तातडीने कारवाईची गरज आहे.