१९८३ पासून पुणे पोलिसांकडून १९ एन्काउंटर; संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर पावले

0

१९८३ पासून आजवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात (पूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली) १९ एन्काउंटर करण्यात आले आहेत. या कारवायांचा उद्देश संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे उच्चाटन करणे आणि पुणे महानगर क्षेत्रातील वाढत्या टोळीवाद व खंडणीप्रकरणांना रोखणे हा होता.

अलीकडील एन्काउंटर रविवारी सोलापूरमध्ये झाला, ज्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहिम शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांनी सांगितले की, “पोलिसांना माहिती मिळाल्यावर आमची टीम सोलापूरला पोहोचली. आरोपीने आमच्यावर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले. आरोपी जखमी झाला आणि रुग्णालयात मृत्यू झाला.”

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

एन्काउंटर कारवाई:

  • १९८६: पुण्यातील पहिले अधिकृत एन्काउंटर. राजू शेख आणि हाशिमुद्दीन पठाण या गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. पोलिसांनी लाठ्यांनी प्रतिहल्ला करत त्यांना ठार केले.
  • १९९२: एकाच वर्षी चार एन्काउंटर – जंग्या भोसले, सुरेश टकले, खलील शेख, मोहम्मद शेख या गुन्हेगारांचा खात्मा झाला.
  • १९९५: पुण्यातील जमिनींचे दर वाढल्यानंतर भूमाफियांचा उदय झाला. याच वर्षी अरुण गवळी टोळीचे किरण वाळवकर आणि रवी करंजावकर यांचा पोलिसांनी खात्मा केला.
  • १९९७: प्रमोद मालवडकर या कुख्यात गुन्हेगाराचा खात्मा झाला. हे एन्काउंटर पुण्यातील दोन प्रमुख टोळ्यांतील संघर्षातील टर्निंग पॉइंट मानले जाते.
  • २००१ ते २००९: अनेक गुन्हेगार पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाले. त्यात दिलीप गोसावी, रोहिदास येवले, रमेश तवारे, राजेश चौधरी, बाबा गंडाळे, संजय शेलके, रॉबर्ट साळवे, संतोष ओव्हाळ यांचा समावेश होता.
  • २००९: मुबीन इसाक शेख या गुन्हेगाराचा तळोजा येथे एन्काउंटर झाला. तो १८ गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता.
  • २०२५: १६ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एन्काउंटर – शाहरुख ऊर्फ अट्टी रहिम शेख याचा सोलापुरात खात्मा.
अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

प्रसिद्ध फौजदारी वकील मिलिंद पवार यांनी सांगितले, “पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी एन्काउंटर हे टोकाचे पाऊल उचलले असले तरी, त्याच्या कायदेशीरतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. काही घटनांमध्ये हे प्रकार न्यायबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे.” पोलिसांच्या मते, अशा कडक कारवायांमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे. मात्र, मानवी हक्क संघटनांनी या कारवायांवर सवाल उपस्थित केले आहेत.