महापालिका आयुक्तांचे निर्देश : एक आठवड्यात बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवा

0
1

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या स्पष्ट आदेशानंतर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील सर्व बेकायदेशीर फलक एक आठवड्यात हटविण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आयुक्त राम म्हणाले, “शहरभरातील सर्व बेकायदेशीर होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “ज्या फलकांना अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळाली आहे, त्यांचाही पुन्हा आढावा घेण्यास सांगितले आहे.”

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात आढावा बैठक घेतली. पावसाळ्याची सुरुवात आणि मागील दुर्घटनांचा दाखला देत, पवार यांनी जिल्हा व महापालिका प्रशासनाला होर्डिंग दुर्घटना टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

ते म्हणाले, “पावसाळ्यात होर्डिंग कोसळून अपघात होण्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात कारवाई करणे अत्यावश्यक आहे.”

महापालिका आयुक्तांनी इशारा दिला की, निर्देशांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, महापालिकेतील काही अधिकारी आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणारे यांच्यात संगनमत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नियमांचे उल्लंघन माहीत असूनही कारवाईला विलंब किंवा दुर्लक्ष करण्यात आल्याचे आरोपही होत आहेत.