‘मी वक्तव्यावर ठाम, माफी नाहीच’ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण; तेसुद्धा कायम धर्माचाच आधार घेतात

0

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केलं होतं. “औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत आपण वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

“मी महायुती सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली. त्याचा मोठा संदर्भ आहे. मी असाच संदर्भ देऊन बीडमध्ये देखील बोललो होतो. आता या विषयाच्या संदर्भात भाजपाचे नेते आणि त्यांचे मित्रपक्ष त्यांना औरंगजेब म्हणण्यात का गुंतले आहेत? हे मला काही समजत नाही. औरंगजेब क्रूर होता, हेच माझं म्हणणं होतं आणि मी देखील तेच म्हटलं होतं. यात औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा काही विषय नाही”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

“मी जे विधान केलं ते विधान राज्यकारभाराच्या अनुषंगाने होतं. औरंगजेब ज्या क्रूर पद्धतीने राज्यकारभार चालवत होता, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार चालला आहे, असं विधान केलं होतं. त्या विधानावर मी अद्यापही ठाम आहे. जसं औरंगजेबाने जिझिया कर लावला होता, तसाच कर आता महाराष्ट्रातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस लावत आहेत. शाळेच्या वह्या, पुस्तकावर कर लावला, स्मशान भूमीतील लाकडांवरही कर लावला आहे. त्यामुळे ही सर्व कार्यप्रणाली त्याच प्रकारची आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.

“आमची ही राजकीय टीका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका केली तेव्हा शब्दांचा तोल कुठेही गेलेला नाही. फडणवीस हेच औरंगजेब आहेत असं मी बोललेलो नाही. त्यांनी तशीच वेशभूषा करावी आणि ते तसेच आहेत असं मी म्हटलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी व्यक्तिगत टीका केलेली नाही. राज्य कारभारावर टीका केलेली आहे आणि ती टीका करणं हा आमचा अधिकार आहे. तसेच मी केलेली टीका अतिशययोक्ती नाही. आता ही महाराष्ट्राच्या अस्मितेवरची टीका असल्याचं भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हटलं. मात्र, जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या होते, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का? स्वारगेटच्या बसस्थानकात अत्याचाराची घटना घडते तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही का?”, असे सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

“औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. तसेच औरंगजेब हा नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत. ते देखील कायम धर्माचा आधार घेतात. त्यामुळे दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा सारखाच आहे”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं.