अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थकांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी (ता. नऊ) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील विष्णू चाटे हा आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक आहे. तर, पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणात अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक वाल्मिक कराड कोठडीत आहे.






दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना एकाने पोलिस ठाण्यात धमकावल्याचा प्रकार घडला होता. त्यावरुन परभणी येथील मोर्चात मनोज जरांगे यांनी वापरलेल्या वक्त्याने दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचा आरोप करत मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध पेालिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे नांेदहोत आहेत.
आज गुरुवारी पाटोदा पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खाडे यांच्या फिर्यादीवरुन श्री. जरांगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद झाला. यापूर्वीही धनंजय मुंडे समर्थकांच्या फिर्यादीवरुन परळी शहर, परळी ग्रामीण, अंबाजोगाई शहर, केज, धारुर, वडवणी, शिवाजीनगर बीड, गेवराई, चकलांबा व दिंद्रूड पोलिस ठाण्यात नऊ अदखलपात्र गुन्हे नोंद झाले आहेत.











