मुंबई दि. १७ (रामदास धो. गमरे) शब्दांचे जादूगार, काव्याचे बादशाह, कोकनरत्न, प्रतिभावान कवी नवनीत खरे यांच्या गीत गुंफा काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि नवनीत खरे यांचा २३ वा स्मृतीदिन असा संयुक्त कार्यक्रम सम्यक कोकण कला संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने संस्थेचे माजी महासचिव राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे संपन्न झाला.






कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नामवंत कलावंतांनी कालकथित कोकनरत्न नवनीत खरे यांच्या जीवनपटावर बहारदार अश्या गीतंगायनाचा कार्यक्रम सादर केला, सम्यक कोकण कला संस्थेचे अध्यक्ष कवी-गायक मंदार दाजी कवाडे व साहित्यिक प्रा. संतोष खरे यांच्या संकल्पनेतून नवोदित कवींना जुन्या प्रतिभासंपन्न कवींची लेखनशैली अभ्यासता यावी व नवनीत खरे यांच्या लेखनीतून उतरलेल्या कविता गीत गुंफा या काव्यसंग्रहामार्फत लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी नवनीत खरे यांच्या २३ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील जेष्ठ कवी, गीतकार, गायक, वादक अश्या ४५ मान्यवर वयोवृद्ध कलावंतांना मंदार दाजी कवाडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी-गायक-संगीतकार संतोष गमरे यांनी लाघवी व प्रभावी शैलीने करून सभागृह मंत्रमुग्ध केले व सर्वांची मने जिंकून घेतली, तर कार्याध्यक्ष भगवान साळवी व मुकुंद तांबे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, प्रास्ताविक सादर करताना कवी-गायक-संगीतकार विनोद धोत्रे यांनी नवनीत दादांच्या जीवनपटाचा आढावा घेत असताना “दादांची काव्यरचना, बांधणी आणि शब्दावरची पकड याची सौदाहरण माहिती दिली, त्यांच्या गाजलेल्या गीतांवर निरूपण करून दादांची आठवण प्रत्येक रसिकाच्या मनावर कायमस्वरूपी राहील” असे नमूद केले.
सदर प्रसंगी जेष्ठ कवी नाथा जाधव, दीनानाथ कांबळे व राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांच्या शुभहस्ते गीत गुंफा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी-गायक, कलावंतांचे आधारस्तंभ महाकवी विष्णू शिंदे हे प्रमुख अतिथी या नात्याने बोलत असताना “दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, नवोदित कवींना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केलं, जुन्या कलावंतांनी केलेल्या चुकांचे चिंतन करून त्या चुका आपण करणार नाही याची दखल घेतली पाहिजे तसेच व्यसनाने अनेक जेष्ठ, वरिष्ठ व प्रतिभावान कलावंताना आपल्या मगरमिठीत घेऊन त्यांना संपवलं आहे म्हणून नवोदितांनी व्यसनापासून चार हात लांब राहील पाहिजे व आपली शब्दरचना व शब्दफेक यावर बारकाईने निरीक्षण करून त्यात सुधारणा केली पाहिजे” असे मौलिक मार्गदर्शन करून नवनीत दादांना २३ व्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्रातील जेष्ठ गायिका सुषमादेवी आणि चंद्रकला गायकवाड यांनी देखील आपले मौलिक विचार करून दादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. सदर कार्यक्रमाचे आयोजक व नवनीत दादांचे पट्टशिष्य जेष्ठ कवी-गायक, संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे यांनी दादांमुळे मी घडलो अशी स्पष्ट शब्दात कबुली देत दादांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत असताना “मी त्यांच्याकडे गाणी शिकायला जात असताना ते म्हणत तू कलेवर प्रेम करतो म्हणून जर कलेवर प्रेम कायम ठेवून तुला खऱ्या अर्थाने कला शिकायची असेल तर प्रथम आपली नोकरी आणि कुटुंब सांभाळून या गोष्टी कर कारण आम्ही अनेक संकटांना सामोरे जात इथवर आलोय ती वेळ तुमच्यावर येता कामा नये म्हणून पोटापाण्याची सोय करून मग स्वतःला कलाक्षेत्रात झोकून द्या असे सांगितले त्यांचा आदेश प्रमाण मानून मी नोकरी करून परिवार सांभाळत कलाक्षेत्रात उभा राहिलो ते नवनीत दादांच्या मार्गदर्शनामुळे” असे नमूद करीत दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमास मिलिंद खरे, विद्याधर कवाडे, राहुल कवाडे, अमित कवाडे, संध्याताई गायकवाड, छायाताई मोहिते, अरविंद रुके, संजय मोरे, हरिभाऊ तांबे, दिलीप पवार, भगवान जाधव, दयानंद तांबे, मिनाक्षी थोरात, दीपाली शिंदे, छाया मोरे, नाथा जाधव आदी मान्यवर कवी-गायक, संगीतकार, कवियत्रींनी उपस्थिती लावून नवनीत दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
अध्यक्षीय भाषणात राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी “कोकनरत्न नवनीत खरे हे शब्दांचे बादशहा होते, त्यांची काव्यगुंफण्याची कला व शब्दांवरील पकड ही अत्यंत सिद्धहस्त असल्याने त्यांच्या काव्याची कोणालाही काटछाट करता आली नाही, त्यांना अनेक भाषा अवगत होत्या पालीभाषेवर त्यांचे प्रभुत्व होते, धार्मिक गीतावर त्यांची विशेष पकड होती, त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या परंतु त्यांच मन त्यात रमत नव्हतं व त्यांनी कलाक्षेत्रात झोकून दिल व त्या माध्यमातून त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, आजही त्यांची गीते ऐकताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही, त्यांच्या अनेक मैफिली मी जवळून पाहिल्यामुळे त्यांची प्रेक्षकांना खिळवुन ठेवण्याची प्रतिभा ही केवळ जादूच म्हणावी लागेल त्यामुळे असे प्रतिभावान कवी नवनीत खरे हे शतकात एकदाच होतात” असे नमूद करीत दादांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मंदार कवाडे यांनी वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित करून नवोदित कवींना नवनीत दादांच्या लेखणीची ओळख व्हावी म्हणून ठराविक गीतांचे संकलन करून गीत गुंफा नावाने केलेला काव्यसंग्रह याकरता मंदार कवाडे यांचा ही गौरव केला, सरतेशेवटी संतोष गमरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











