‘राज्यसभेचे सभापती स्वत:ला आरएसएसचे एकलव्य म्हणतात, पण विरोधी सदस्यांसाठी…,’ खर्गेंचा घणाघात

0

इंडिया आघाडी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्वाव आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकार परिषदेतून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जगदीप धनखड यांच्यावर घणाघात केला आहे. तसेच खर्गेंनी सभापती धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा मोठा आरोप करत अविश्वास ठराव आणण्याचे कारणही सांगितले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आठवण काढली आहे. ते म्हणाले, पहिल्या उपराष्ट्रपतींनी १९५२ मध्ये आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याचे सांगितले होते. याचाच अर्थ असा होतो की, ते कोणत्याही विशिष्ट पक्षाचे नव्हते तर सर्वपक्षीयांचे होते, ज्यातून त्यांचा निष्पक्षपातीपणा अधोरेखित होतो.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

यासोबतच खर्गेंनी पक्षपातीपणाचे आरोप करत जगदीप धनखड यांना घेरले आहे. ‘उपराष्ट्रपती हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. आतापर्यंत या खुर्चीवर अनेकजण बसले आणि खूप कामही केले. आतापर्यंतच्या प्रदीर्घ काळात कोणत्याही उपराष्ट्रपतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलेला नाही, कारण सर्वांनीच निष्पक्षपातीपणे काम केले. मात्र धनखड यांच्या पक्षपाती वृत्तीमुळे आज दुःखाने अविश्वास प्रस्ताव आणावा लागत आहे. नियमांचे पालन होत नाही’ असे खर्गेंनी नमूद केले.

उपराष्ट्रपतींवर खोचक टीका करत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले, ‘सभापती कधी सरकारचे गुणगान गाऊ लागतात तर कधी स्वत:ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकलव्य म्हणवून घेतात. तर सभापती सभागृहातील ज्येष्ठ आणि कनिष्ठांची दखल घेत नाहीत आणि विरोधी बाकावरील सदस्यांसाठी राजकीय वक्तव्ये करु लागतात. यासोबतच ‘राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात चर्चा करावी असे अध्यक्षांना वाटतच नाही, त्यामुळे ते बोलण्यापासून रोखतात आणि प्रवचन सुरु करतात.’ असा आरोप करत खर्गेंनी ‘विरोधी पक्षाचे लोक पाच मिनिटे बोलत असतील तर सभापतींचे भाषण १० मिनिटांचे असते’ असेही नमूद केले आहे.ii

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

‘सभापती पदोन्नतीसाठी सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करत असल्याचे दिसते. त्यामुळे राज्यसभेतील सर्वात मोठा व्यत्यय हे स्वतः सभापतीच असून ते इतरांना फक्त सूचना देत राहतात,’ अशी टीका देखील खर्गेंनी केली आहे. तर ‘विरोधी पक्ष संरक्षणासाठी सभापतींकडे जात असतात, मात्र सभापती पंतप्रधानांचे उघडपणे कौतुक करण्यात व्यस्त असतात, तेव्हा कुठे जायचे? असा सवालही खर्गेंनी उपस्थित केला आहे.