बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

0

मुंबई दि. ६ (रामदास धो. गमरे) “माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या व प्रजासत्ताक भारत देशाला संविधान देणाऱ्या, महिला, आबालवृद्ध, शोषित, पीडित, वंचित, मागास, गोरगरीब नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार मिळवून देणाऱ्या महामानव, विश्ववंदनिय, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्धजन पंचायत समितीचे सन्मानिय सभापती मा. आनंदराज आंबेडकर यांच्या अधिपत्याखाली समितीचे संपूर्ण व्यवस्थापक मंडळ, महिला मंडळ, कार्यकारिणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दादर चैत्यभूमी येथे सकाळी ठीक ९:०० वाजता बाबासाहेब आंबेडकरांना साश्रू नयनाने मानवंदना देण्यात आली.

सदर मानवंदना दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे समितीचे उपसभापती मा. विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले, सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या शुभहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पसुमने अर्पण करण्यात आली व सरचिटणीस राजेश घाडगे यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात केली. तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश भा. पवार गुरुजी व मनोहर बा. मोरे गुरुजींनी सुमधुर वाणीने धार्मिक पूजा संपन्न केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, बौद्धाचार्या साक्षी मोरे, मध्यवर्ती महिला मंडळाच्या उपाध्यक्षा प्रमिला मर्चंडे, विवाह मंडळाचे चिटणीस अतुल साळवी, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर मौलिक विचार मांडीत शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांनी कशाप्रकारे लढाऊ व जिद्दीवृत्तीने कामकाज केले, पोटाची चार मुले मातीआड करीत शोषितांच्या न्यायहक्कांसाठी मनुवाद्यांना कसे पुरून उरले, शिक्षण व पुस्तकांवर असलेले त्यांचे प्रेम या संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यामुळं उपस्थितांना बाबासाहेबांच्या आठवणी ताज्या झाल्या व त्यांच्या महान उपकारांची जाण झाल्याने आपसूकच सर्वांच्या डोळ्यांत पाणी आले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

उपसभापती विनोद मोरे हे आपले विचार व्यक्त करीत असताना म्हणाले की “बाबासाहेबांचे जीवन हे नेहमीच संघर्षमय राहिले त्यांनी मोठ्या पराकाष्ठेने अनंत अडचणींचा सामना करत संविधान समितीत स्थान मिळवत कोणाचीही मदत न घेता एकहाती संविधान लिहिले, अनेक संकटांना झेलत वंचित, मागास, अस्पृश्य, गरीब, उपेक्षितांसाठी आपला लढा कायम ठेवला म्हणूनच आज देशातील अनेक मान्यवर नेत्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या कधी येतात व जातात हे कळत देखील नाही परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे नेते आहेत ज्यांची जयंती १४ एप्रिलला सुरू होऊन जूनपर्यंत चालते व त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला अथांग असा जनसागर चैत्यभूमीला लोटतो, अश्या महान महामानवाचे आपण अनुयायी आहोत म्हणून त्यांच्या विचारांचे पालन केले पाहिजे व आदर्शव्रत जीवन जगले पाहिजे, आज लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत येथे आपले एकही उमेदवार नाही ही परिस्थिती ही आपण बदलली पाहिजे समितीच्या माध्यमातून जनजागृती करीत सर्वांनी एकसंघ होऊन बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे” असा ही संदेश दिला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, चिटणीस लवेश तांबे, यशवंत कदम, रवींद्र शिंदे, अरुण जाधव, संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, मनोहर बा. मोरे, महिला मंडळाच्या साक्षी मोरे, प्रमिला मर्चंडे, विलास जाधव, गटक्रमांक १३ चे गटप्रतिनिधी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, माजी गटप्रमुख प्रकाश कासे, गजानन तांबे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव आदी मान्यवर, विभागीय शाखा प्रतिनिधी, सभासद, कार्यकर्ते सदर अभिवादन सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा