महायुतीत जागा वाटपावरुन वाद-विवाद, तारीख पे तारीख सुरु, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

0

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. राज्यात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुती , महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडीही रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात काटे की टक्कर देखील पाहायला मिळू शकते. दरम्यान, सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमध्ये जागा वाटपावरुन बराच खल सुरु आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत सुरु असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेवर भाष्य केलं आहे.

रामदास आठवले काय काय म्हणाले?

महायुतीत जागावाटपाचा तिढा हा तारीख पे तारीखमध्ये अडकलाय. अजून ही भाजप, शिंदे आणि अजित पवार गटात वाद-विवाद सुरु असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवले यांनी केलाय. लोणावळ्यात पत्रकार परिषदेत आठवलेंनी जागावाटपातील तिढ्यावर भाष्य केलं. या तीन प्रमुख पक्षातील जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर संपेल आणि आम्हाला यात योग्य त्या जागा मिळतील, अशी अपेक्षा आठवलेंनी व्यक्त केली.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

महायुती सोडून जाण्याचा निर्णय घेणार नाही

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले, कमी जागा मिळाल्या तरी मी दुसरा काही निर्णय घेणार नाही. आम्ही महायुती बरोबरच राहणार आहोत. राज ठाकरे विरोधात आहेत, प्रकाश आंबेडकर विरोधात आहेत. शिवाय संभाजीराजे आणि बच्चू कडूही विरोधात आहेत. त्यामुळे वेगळा निर्णय घेण्याची आमची भूमिका नाही. आम्हाला एमएलसी किंवा महामंडळं द्यावं. जिल्हा तालुक्यातील कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग मिळावा. या गोष्टींचं महायुतीने आम्हाला आश्वासन द्यावं. तीन पक्षात वाद विवाद सुरु आहेत, त्यामुळे जागा थोड्या कमी जास्त होतील. लवकरात लवकर जागांचा तिढा सुटेल, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

उमेदवारी मिळणार नाही, असे लोक पवारांकडे जात आहेत.

आम्हाला काहीतरी जागा सुटल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. आमच्याकडे तिकीट मिळत नाही, ते शरद पवारांकडे जात आहेत. त्यांच्याकडे इनकमिंग सुरु आहे, असं म्हणता येणार नाही. हर्षवर्धन पाटील आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना विधानपरिषद दिली असती तर ते गेले नसते. शिवाय, उमेदवारीचं आश्वासन दिलं असतं तरी ते गेले नसते. तिथे अजितदादांचा आमदार आहे. हर्षवर्धन पाटील अनेकदा अपक्ष निवडून आले होते. एकदा ते काँग्रेसच्या तिकिटावरही निवडून आले होते. पण काही लोक शरद पवारांकडे चालले आहेत, हेही तितकेच खरे आहे, असंही रामदास आठवले यांनी नमूद केलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा