महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला पुढील सरन्यायाधीश निवडावे लागणार आहेत. यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील सरन्यायाधीश कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये सरन्यायाधीशांनंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश हे हे पद भूषवत असतात. यासाठी सध्याचे सरन्यायाधीश नावाची शिफारस करत असतात. आता सीजेआय बी.आर. गवई यांनी नवीन सरन्यायाधीश कोण असतील याची माहिती दिली आहे.






नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस
समोर आलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश भूषण गवई हे सोमवारी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. भूतान दौऱ्यावर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, गवई यांनी सांगितले की, ‘माझ्या कार्यालयाला केंद्र सरकारकडून पुढील सरन्यायाधीशांसाठी शिफारस करण्याबाबत संदेश मिळाला आहे. मी रविवारी दिल्लीत पोहोचेन आणि सोमवारी माझा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहे.’
कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत ?
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सूर्यकांत हे हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता, त्यांचे बालपण संयुक्त कुटुंबात गेले. त्यांचे वडील शिक्षक होते. सूर्यकांत यांची मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यांनी 1981 मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी आणि 1984 मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली.
विविध पदांवर केले काम
सूर्यकांत यांनी न्यायाधीश पदावर येण्यापूर्वी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून काम केले. तसेच ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही होते. सूर्यकांत हे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे पदसिद्ध कार्यकारी अध्यक्ष आहेत. आता 24 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.













