अजितदादांचाच मतदारसंघ धोक्यात! बारामतीकरांचा खरा ‘मेसेज’ काय? याच मतदारसंघातून सुळेंना सर्वाधिक मते

0

बारामती कुणाची, या प्रश्नाचे उत्तर मतदारांनी दिले. बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे 1 लाख 53 हजार 48 मताधिक्याने विजयी झाल्या. दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मोठ्या फरकाने पराभव झाला. पण, निकालाने अजित पवारांची बारामतीतील जागाच धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणूक अजित पवारांसाठी सोप्पी नसणार, असा मेसेज या निकालातून समोर आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात काय घडलंय, हेच समजून घ्या….

बारामती लोकसभा मतदारसंघात खरी निवडणूक झाली ती शरद पवार आणि अजित पवार यांच्यात. महायुतीसोबत गेलेल्या अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. बारामती जिंकण्यासाठी अजित पवार बारामतीत तळ ठोकून होते. पण, निकालाने अजित पवारांना झटका दिला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बारामतीत शरद पवार ठरले वरचढ

अजित पवारांनी बारामती लोकसभा जिंकण्यासाठी ताकद लावली होती, पण निकाल विरोधात लागला. बारामतीवर अजूनही शरद पवारांचे वर्चस्व असल्याचे निकालातून सिद्ध झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाचे जी आकडेवारी आहे, ती अजित पवारांना धक्का देणारी आहे.

अजित पवार लीड, पण सुनेत्रा पवारांना झटका

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध होती. अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर हे भाजपचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार 365 मतांनी पराभव केला होता.

विधानसभा निवडणुकीत इतकं प्रचंड मताधिक्य देणाऱ्या बारामतीने पक्ष फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली नाही, असे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आले आहे. यावेळी जी लोकसभा निवडणूक झाली त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना मोठं मताधिक्य मिळालं आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघात  1 लाख 43 हजार 941 इतकी मते मिळाली. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 96 हजार 560 इतकी मते मिळाली. म्हणजे सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातूनच मताधिक्य मिळू शकलेली नाही.

अजित पवारांसाठी धोक्याचा इशारा

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 47 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवलं आहे. हे मताधिक्यच अजित पवारांसाठी धोक्याचा इशारा आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच बारामतीकरांनी दिलेल्या या निकालामुळे अजित पवारांचे काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 2019 मध्ये भाजपने अजित पवारांविरोधात भाजपचा उमेदवार होता. पण, यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढवू शकतात, ही चर्चा लोकसभेच्या निवडणुकीपासूनच सुरू आहे. तसे झाल्यास बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिली, तर अजित पवारांचा पराभव होऊ शकतो. हीच गोष्ट अजित पवारांची चिंता वाढवू शकते. त्यामुळे अजित पवारांना बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिलेल्या या मेसेजची जोरात चर्चा सुरू आहे.