दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही निघाली पण अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. नाशिकमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही दावा आहे. बुलडाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतच बंडखोरी झाली, उमेदवारी जाहीर होण्याआधीच आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगलेत शिंदेंच्या शिवसेनेकडून धैर्यशील मानेंचा दावा आहे. तर रयत क्रांतीचे सदाभाऊ खोतही आग्रही आहेत. हिंगोलीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, मात्र भाजपसोबत रस्सीखेच सुरु आहे. धाराशीवची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. मात्र भाजप इथून माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशींना तिकीट देण्यास इच्छुक आहे. सुरुवातीला नाशिकवरुन काय हालचाली सुरु आहेत, ते जाणून घ्या.






नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आग्रही आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनीही नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवली. गोडसे आणि मंत्री दादा भुसेही वर्षावरच्या बैठकीत उपस्थित होते. मात्र नाशकात भाजपचे 3 आमदार असून भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळं भाजपच लढणार असं सांगून इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनी हेमंत गोडसेंना मदत करणार नसल्याचं म्हटलंय. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अचानक मंत्री भुजबळांचंही नाव समोर आलंय.
बुलडाण्यात शिंदेंच्या शिवसेनेतच बंडखोरी झालीय. जागा आणि उमेदवारीचा फौसला होण्याआधीच शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांनी अर्जही दाखल केला. बुलडाण्यात प्रतापराव जाधव सध्या शिंदे गटाचेच खासदार आहेत..मात्र महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जागा येणार की नाही. या शंकेनं गायकवाडांनी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे.











