विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज दिशा सालियान प्रकरणावरून गदारोळ झाला. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलत असताना समोरून मंत्री गिरीश महाजन त्यांच्या बोलण्यात अडथळा आणत होते. वारंवार मध्ये बोलत असल्याने अंबादास दानवे भडकले आणि मध्ये मध्ये तोंड घालण्याची तुमची सवय बंद करा, अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांना खडसावले. यावेळी महाजन आणि दानवे यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झडली.






एकाच वेळी तुमचे चार चार लोक बोलतात, आम्ही कधी अडथळा आणतो का? मग आता माझ्या वेळेस तुम्ही मध्ये बोलण्याचे काय कारण? मुळात हा विषय तुमच्या खात्याशी संबंधित आहे का, तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात का? मग मध्ये बोलायची काय गरज आहे. नेहमीमध्ये तोंड घालायची तुमची सवय थांबवा, असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
समोरून महाजन आणि बाकड्यावरून अंबादास दानवे एकमेकांकडे हातवारे आणि इशारे करून बोलत होते. ‘सभापती महोदय नियमानुसार मी बोलतो आहे, समोरच्या बाजूने चार चार लोक बोलत असताना आम्ही सगळ्यांचे ऐकून घेतले. मग आता मी बोलत असताना हे मध्ये का बोलतात? आम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तसे असेल तर मला सांगा मी बाहेर जाऊन बसतो त्यांनाच बोलू द्या’असे म्हणत अंबादास दानवे यांनी सभापतींकडे गिरीश महाजनांना समज देण्याची मागणी केली.
सभापती माझ्याकडे पाहून बोला असे म्हणत असताना गिरीश महाजन मात्र दानवे यांना पाहून मोठ्याने बोलत होते. ‘तुम्हाला काय चौकशी करायची ती करा ना, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसता,एसआयटी नेमलेली आहे, सरकार तुमचा आहे मग करायची ती चौकशी करा, तुम्हाला कोणी रोखले आहे? असे म्हणत अंबादास दानवे यांनी महाजन यांच्यावर संताप व्यक्त केला.
आजच आम्ही राज्यपालांची भेट घेऊन आलो, काही मंत्र्यांची नावे आम्ही तिथे दिली आहेत. नेहमी असले प्रकार खपवून घेणार नाही. मध्ये मध्ये बोलण्याची यांची खोड नेहमीचीच आहे, त्यांना शांत करा नाहीतर माझ्या तोंडून चुकीचा शब्द गेला तर अवघड होऊन जाईल, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. दोन्ही बाजूने सभागृहात गोंधळ होण्याची परिस्थिती निर्माण झाली. गिरीश महाजन आणि अंबादास दानवे एकमेकांकडे पाहून हातवारे करत बोलत होते.
दानवे आपल्या जागेवरून महाजन यांच्या दिशेने जाणार तेवढ्यात सचिन अहिर यांनी त्यांना रोखले. गोंधळ अधिकच वाढणार याचा अंदाज आल्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. माइक बंद झाल्यानंतरही दानवे आणि महाजन एकमेकांना उद्देशून मोठमोठ्याने बोलतच होते. दरम्यान अंबादास दानवे यांनी माज आणि मस्ती आमच्यासमोर चालणार नाही. सत्तेची मस्ती आमच्यासमोर दाखवायची नाही, सत्तेचा माज आला असेल तर मंत्री यांनी आपल्या आकासमोर दाखवावा आमच्याकडे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली.











