विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काही महिन्यांतच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन माजी मंत्री आणि चार माजी आमदारांसह 32 नेत्यांनी एकाचवेळी पक्षाला रामराम ठोकला आहे. या सर्वांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या कट्टर समर्थकांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे.






राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले लालचंद कटारिया, राजेंद्र यादव या बड्या नेत्यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. ते गेहलोत यांचे समर्थक मानले जात होते.
माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा यांनीही भीजपमध्ये प्रवेश केला आहे. बैरवा हे सचिन पायलट यांचे कट्टर समर्थक होते. या नेत्यांसह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहे. या सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मागील निवडणुकीत भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होईल, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.
दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर जाणाऱ्या नेत्यांची लांबचलांब रीघ लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्याचा फटका लोकसभेला बसू शकतो. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नुकतीच राजस्थानमधून गुजरातमध्ये दाखल झाली आहे. त्यानंतर लगेच भाजपने संधी साधत काँग्रेस फोडली आहे.











