संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. या सहा आरोपींची एसआयटी कोठडी आज संपत असल्याने त्यांना आज बीड न्यायालयात व्हिसीद्वारे हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
या सुनावणीदरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी एसआयटीकडून तर वकील अनंत तिडके यांनी आरोपींच्यावतीन युक्तीवाद केला. यावेळी बाळासाहेब कोल्हे यांनी पुन्हा आरोपींच्या एसआयटी कोठडीची मागणी केली. मात्र, आरोपींच्या वकिलांना त्याला जोरदार विरोध केला. अखेर न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांनी सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
दरम्यान, सहाही आरोपींना आता न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असली तरी त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे आरोपी माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत.
९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात या घटनेचे पडसाद बघायला मिळाले होते. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील विविध ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले होते.
दरम्यान, ४ जानेवारी रोजी याप्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.