संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. आधीचे आठ आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभागी होते. १४ जानेवारी रोजी वाल्मिक कराडला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी केलं. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाल्मिकवर मोक्कांतर्गत कारवाई झाली.






वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख खून प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात एसआयटीला पुरावे आढळले आणि वाल्मिकवर कारवाई झाली. मात्र या गँगचा म्होरक्या कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एसआयटीने १४ तारखेला कोर्टासमोर अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये ९ डिसेंबर रोजी ३ ते ६ या दरम्यान वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचे फोन कॉल झाल्याचं निष्पन्न झालं. एवढंच नाही तर अपहरणाच्या त्या दहा मिनिटांमध्येही यांचे एकमेकांना फोन कॉल झालेले आहेत. त्यामुळेच एसआयटीने वाल्मिकवर मोक्का लावला.
९ आरोपींवर मोक्का लागला मात्र या गँगचा लीडर कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. काही माध्यमांनुसार सुदर्शन घुले हा त्या गँगचा लीडर असून वाल्मिक कराड हा सदस्य आहे. तर काहींनी वाल्मिक कराड म्होरक्या असल्याचं म्हटलंय. एसआयटीने अद्याप याबाबत माध्यमांना काहीही माहिती दिलेली नाही.
तपास अधिकारी बदलला
संतोष देशमुख खून प्रकरणाशी संबंधित प्रकरणात वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अॅट्रॉसिटी, खंडणी, खून, मकोका हे गुन्हे दाखल आहेत. खून आणि खंडणी प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्याकडे होता. परंतु अशा प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित असल्याने अप्पर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे खून आणि मकोका प्रकरणाचा तपास असेल. तर गुजर हे खंडणी आणि त्याच्याशी संबंधित इतर प्रकरणांचा तपास करतील.











