रोजच्या गरजेच्या खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीची फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. टोमॅटोच्या किमती तर आता अव्वाच्या सव्वा वाढल्याचं दिसतंय. अशात जर तुम्ही McDonald’s मध्ये जाऊन बर्गर किंवा इतर काही खाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन McDonald’s ने त्यांच्या फूड मेन्यूमधून टोमॅटो वगळण्याचा निर्णय घेतला आहे.






कंपनीने आज 7 जुलै रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, खरेदीच्या अडचणींमुळे तात्पुरते टोमॅटो आपल्या मेनूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या (उत्तर आणि पूर्व विभाग) प्रवक्त्याने सांगितले की हंगामी समस्यांमुळे मॅकडोनाल्ड्सने आपल्या खाद्य मेनूमध्ये टोमॅटो समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मॅकडोनाल्ड्सच्या भारताच्या पश्चिम आणि दक्षिणेकडील फ्रँचायझींनी असे म्हटले आहे की त्यांच्या 10 ते 15 टक्के स्टोअर्सना खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु कंपनीला या क्षेत्रांमध्ये टोमॅटोच्या उपलब्धतेच्या कोणत्याही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. मॅकडोनाल्ड्स इंडिया वेस्ट आणि साउथने म्हटले आहे की ही एक हंगामी समस्या आहे आणि रेस्टॉरंट्स तसेच खाद्य उद्योगांना दरवर्षी पावसाळ्यात या महागाईचा सामना करावा लागतो.
टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम
देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडत असल्याचे स्पष्ट झाले असून अनेक राज्यांमध्ये झालेला मुसळधार पाऊस याला कारणीभूत आहे. त्यामुळे हंगामी समस्यांमुळे पुरवठा साखळी प्रभावित झाली असून, वाहतुकीपासून ते पिकाच्या गुणवत्तेपर्यंत नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि उत्तर प्रदेशसारख्या भागात टोमॅटोचा भाव 130-180 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
ही तात्पुरती समस्या
मॅकडोनाल्ड्स इंडियाने आपल्या संपूर्ण निवेदनात नमूद केले आहे की ही एक तात्पुरती समस्या आहे आणि कंपनी शक्य तितक्या लवकर आपल्या फूड मेनूमध्ये टोमॅटोचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की, मॅकडोनाल्ड्स इंडियाने आपल्या ब्रँड, फूड क्वालिटी आणि सुरक्षेबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे कंपनीकडे येणारे टोमॅटो हे कंपनीच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेशी मेळ खात नसल्याने काळासाठी खाद्य मेनूमधून काढून टाकावे लागत आहेत.











