पुणे: पुणे शहरामध्ये काँग्रेसला प्रथमच सर्वोच्च कामगिरी करण्याची संधी मिळत असताना पुणे शहरात सुरू असलेले तीन गटांचे राजकारण ही खरी डोकेदुखी असली तरी याचा एक फायदा काँग्रेसला मात्र झालेला आहे कारण काँग्रेस दावा करत असलेल्या मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले यामध्ये तब्बल शहरातील सात मतदारसंघांत काँग्रेसच्या २९ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मुळात शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळण्याच्या आशा पल्लवी झाल्यानंतर या भागामध्ये मोठी चुरस खाण्यास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पक्षीय पातळीवरती (शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या आदेशाने दोन्ही नियुक्त्या) मोकाटे यांचं वर्चस्व वाढत असताना पुन्हा त्यांनी मतदारसंघावर दावा केल्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाची कोथरुड विधानसभा मतदार संघात वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक आठ इच्छुक असून, खडकवासला मतदारसंघातून मात्र उमेदवारीसाठी एकही अर्ज आलेला नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. अर्जाकरिता खुल्या प्रवर्गासाठी २० हजार, तर महिला आणि आरक्षित प्रवर्गासाठी १० हजार इतके शुल्क ठेवण्यात आले होते. आघाडीच्या जागावाटपानुसार काँग्रेसकडे तीन मतदारसंघ असले तरी खडकवासला मतदार संघ वगळता अन्य सात मतदारसंघांत इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यासंबंधीची माहिती दिली.
त्यानुसार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी महापौर कमल व्यवहारे, मुख्तार शेख, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर यांचा समावेश आहे. पुणे कॅन्टोमेन्टमधून माजी नगरसेविका लता राजगुरू, सुजित यादव, मिलिंद अहिरे, रवींद्र आरडे, छाया जाधव यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेले माजी मंत्री रमेश बागवे यांनी अर्ज भरलेला नाही. (थेट मुंबई प्रदेश कार्यालयात अर्ज जमा करायला असल्याची चर्चा आहे) नव्याने पक्षात आलेले अविनाश साळवे यांचाही अर्ज नाही. याशिवाय शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचाही अर्ज आला नसून आपण निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजीनगरमधून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, मनीष आनंद, महिला शहराध्यक्षा पूजा आनंद, राज निकम, महेंद्र सावंत, अॅड. रमेश पवळे, जावेद निलगर, सुनील भोसले, यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातून संजय पाटील, रमेश सकट, राजू ठोंबरे, सुनील मलके उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पर्वती मतदारसंघातून माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल, संभाजी जगताप, संतोष पाटोळे यांनी संधीची मागणी केली आहे तर हडपसरमधून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर व हाजी तांबोळी यांनी तिकीट मिळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच कोथरूडमधून एकमेव संदीप मोकाटे यांचा इच्छुकांच्या समावेश आहे.