राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आणि राजकीय चर्चांना उधाण आलं. अजित पवारांसह अनेक ज्येष्ठ नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार त्यांच्यासोबत ३० आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यापैकी ९ आमदारांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतील नेते संतापले असून आमदार रोहित पवार हे सातत्याने या नेत्यांवर टीका करत आहेत.






गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे ट्विटरच्या माध्यमातून बंडखोरांवर निशाणा साधताना दिसत आहेत. आज सकाळी (7 जुलै) त्यांनी बंडखोर नेते सुनील तटकरे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर कडाडून टीका केली.
काय आहे रोहित पवारांच ट्विट ?
ट्विटरमधील या पोस्टमध्ये रोहित पवारांनी सुनील तटकरेंच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख त्यांना मिळालेल्या पदांची यादीच जाहीर केली आहे. तुम्हाला काय कमी केलं होतं ? असा सवालही त्यांनी तटकरेंना विचारला आहे. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..? अशी बोचरी टीका रोहित पवारांनी केली.
‘ पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं ? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधित्त्व करत आहात. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..?’
‘मा. तटकरे साहेब, रायगड जिल्हा नेहमीच आपल्या अधिपत्याखाली राहील याची काळजी मा. पवार साहेबांनी घेतली. आमदराकी, खासदारकी, मंत्री अशी सर्वच पदं आपल्या एकट्याच्याच घरात दिली. अध्यक्षपदाची जबाबदारीही आपल्यावर सोपवली होती. पण ज्यांनी हे पद सांभाळलं, त्यानेच इतरांच्या दावणीला हा पक्ष का बांधावा ? असा प्रश्नही आपल्याला कसा पडला नाही ? आमच्यासारख्या कार्यकर्त्याने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा ? ‘ अशा शब्दांत रोहित पवारांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी ? असा सवालही त्यांनी तटकरेंना विचारला आहे.
यापूर्वी गुरूवारी रोहित पवार यांनी दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनाही सवाल विचारत त्यांच्यावर टीका केली होती.











