आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भेटी गाठीचे सत्र सुरु आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक ट्विट केले आहे.






मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नवी दिल्लीला गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीत काय चर्चा झाली. याची माहितीही शिंदे यांनी शाह यांना दिल्याचं वृत्त आहे. तर या भेटीबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली. याबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये काय म्हंटलं आहे?
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत.
राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.
राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत.
यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार ….
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी अनेक इच्छूक आमदार देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.











