दिल्ली भेटीतच ठरलं अन् हा असेल मुहर्त; शिवसेना वर्धापनदिनीचं ‘मोठं गिफ्ट’ चर्चाही पुर्ण

0

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखावर तारखा समोर येत आहेत. मात्र आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (4 जून) दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले… ‘शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी विस्तार व्हावा’

19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. सोबतच शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हवा असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा झाल्यास तो 19 जून आधी होऊ शकतो. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री उशिरा मुंबईत परतले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मंत्रिमंडळ विस्तारात नवोदित आणि महिलांना संधी

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला जाणार आहे. म्हणजेच भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर असणाऱ्या नेत्यांचीच मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात काही नवोदितांना संधी मिळणार तर प्रभाव पाडू न शकणाऱ्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला केलं जाणार असल्याचंही समजते. महत्त्वाची बाब म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांनाही स्थाना मिळणार असल्याचं समजतं. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिलं नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र विस्तारात महिलांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

शिवसेनेचे (शिंदे गट) दोन खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात?

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा देखील केंद्रीय नेतृत्वाचा विचार असून, या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटाच्या दोन खासदारांची वर्णी लागू शकते. यावरही अमित शहा यांची या दोन्ही नेत्यासोबत चर्चा झाली.

न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या : बच्चू कडू

काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची केवळ चर्चाच सुरु असल्याने आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाच्या अनेक तारखा झाल्या आहेत. एवढंच नाही तर न्यायालयाच्या तारखांपेक्षा मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा जास्त झाल्या आहेत, असं बच्चू कडू म्हणाले होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार