कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ अल्पवयीन मोटारचालकाचेच नव्हे, तर त्याच्याबरोबर असलेल्या आणखी दोघांच्या रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती समोर आली आहे. तिघांचा जो रक्तगट आहे, त्याच रक्तगटाच्या अन्य तिघांना बोलावून त्यांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात घेण्यात आले. अल्पवयीन मोटार चालकासह त्याच्याच वयाचे दोन मित्र आणि चालक, असे चौघे मोटारीतून प्रवास करत होते.
अपघातानंतर सुमारे नऊ तासांनी अल्पवयीन मोटार चालक आणि त्याचे दोन मित्र, अशा तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये नेले, तिघांच्या रक्तात अल्कोहोल आहे का? याची तपासणी करण्यासाठी रक्तसंकलन महत्त्वाचे होते. त्यामुळे त्यांचे रक्त घेतले पण त्याच वेळी आणखी तिघांना ससूनमध्ये बोलविण्यात आले. त्या तिघांचेही रक्तगट अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांच्या रक्तगटाशी जुळणारे होते. रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तिघांचे रक्तनमुने घेतले. ते नेमके कशासाठी घेतले जात आहेत, याची कानोकान माहिती होणार नाही, याची पूर्ण दक्षता तेथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर याने घेतली. त्याच वेळी हाळनोर याने अल्पवयीन आरोपीसह दोन मित्रांचे नमुने घेण्यास सांगितले. त्यानंतर अल्पवयीन मुलांचे रक्तनमुने बाजूला ठेऊन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी घेतलेले नमुने तपासण्यासाठी पोलिसांना दिल्याची माहिती मिळाली.
का बदलले नमुने ?
अल्पवयीन मोटारचालकासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्तामध्ये अल्कोहोलचा अंश निघण्याची शक्यता गृहीत धरून तिथांचे रक्तनमुने बदलण्यात आले. त्यासाठी या तिघांचा रक्तगट जुळणाऱ्या इतर तिघांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले.आह ससूनमध्ये रविवारी (ता. १९) ही घटना घडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे .
मुख्य सूत्रधार कोण?
रक्त नमुन्यांची अदला-बदल करण्यासाठी आरोपीच्या रक्तगटाशी जुळणाऱ्या तिघांना रुग्णालयात बोलविण्यामागील मुख्य सूत्रधार वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ असला पाहिजे. त्याशिवाय इतक्या अचूक पद्धतीने नियोजन करून रक्त नमुन्यांची अदला- बदल शक्य नाही, या सर्व घटनेचा मुख्य सूत्रधार बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकीय विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे असल्याचा संशय पोलिसांना आहे.
बिंग असे फुटले?
तपासणीसाठी अल्पवयीन मुलांचे रक्तनमुने न पाठविता अन्य तिघांचे नमुने पाठविले. अन्य तिघांमध्ये एक महिला होती. या घटनेच्या मुख्य सूत्रधाराने रक्तातील तपासणीत फक्त रक्तगट आणि अल्कोहोलचा विचार केला होता. त्याची ‘डीएनए’ तपासणी होईल, याची शक्यता गृहीत धरली नव्हती. ‘डीएनए’ तपासणी झाल्याने त्यात एका महिलेचे रक्त असल्याचे गुणसूत्रांच्या तपासणीतून उघड झाले. महिलांमध्ये ‘एक्स एक्स’ गुणसूत्रे असतात, तर पुरुषांमध्ये ‘एक्स वाय’ असतात. मोटारीतून तीन अल्पवयीन मुले प्रवास करत असताना महिलेचे रक्त नमुने कसे? या प्रश्नाचा शोध घेतला असता वरील माहिती मिळाली.