मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) चिपळूण तालुक्यातील दोनवली गावचे सुपुत्र, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, सुप्रसिद्ध व्याख्याते, पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्रा. विजय कृष्णा मोहिते लिखित “पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण प्रबोधिनी, अपरांत साहित्य कला प्रबोधिनी व प्रियदर्शी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ साहित्यिक व पँथर नेते ज. वी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फोर्ट, मुंबई – १ येथे दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.






सदर कार्यक्रमास सधम्म पत्रिकेचे प्रा. आनंद देवडेकर, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या डॉ. अशोक सुनतकरी व भवन्स महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. क्रांती गवळी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते, कार्यक्रमाच्या प्रारंभी जेष्ठ साहित्यिक ज. वी. पवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यावर सधम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक पत्रकार विजय झीमूर यांनी आपल्या धीरोदत्त आवाजात लाघवी भाषाशैलीत सादर केले.
अध्यक्षीय भाषणात ज. वी. पवार यांनी पाली भाषेची महानता विशद करताना “पाली भाषा ही केवळ प्राचीन भारतीयांची राजभाषा नव्हे, तर त्या युगाच्या ज्ञानपरंपरेची, संस्कृतीची आणि बौद्धिक वैभवाची मूळ शिल्पकार होती. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या करुणा, समता आणि मानवतावादी तत्त्वज्ञानाच्या सार्वत्रिक प्रसारासाठी पाली भाषेचा स्वीकार केला आणि तिच्या माध्यमातून लोकमानसाशी संवाद साधला. या प्रभावामुळे पाली भाषेला केवळ अभिजात या पदवीचा सन्मान नाही, तर ती आजही भारतीय इतिहासाचा सजीव पुरावा, एक सांस्कृतिक शिलालेख आणि अध्यात्मिक परंपरेचा अचल श्वास म्हणून समोर येते.” असे अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते प्रा. आनंद देवडेकर यांनी आपल्या प्रभावी भाषण सादर करताना “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारताना केवळ धर्मांतरण नव्हे, तर एक जागृत, समर्पित आणि मिशनरी भावनेने परिपूर्ण धर्मक्रांतीची अपेक्षा केली होती. बाबासाहेबांना अशा समाजाची निर्मिती हवी होती, जो केवळ धम्म जाणणारा नव्हे, तर धम्म जगणारा आणि धम्माचा प्रसार करणारा सच्चा समाज असेल.” असे नमूद करीत त्याच संदर्भाने त्यांनी उपस्थितांना बौद्ध मिशनच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे, धम्माच्या तत्त्वांचे व्यवहारात अनुकरण करण्याचे आणि बुद्ध-वचनांच्या प्रकाशाने समाजाला दिशा दाखवण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्त्या डॉ. क्रांती गवळी यांनी आपल्या विचारप्रवर्तक भाषणात “बुद्धांच्या काळात स्त्रियांना मिळालेली बौद्धिक स्वातंत्र्य, वाणीची प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक समानतेचा अधिकार हेच आजच्या स्त्री-सक्षमीकरणाच्या संकल्पनांचं प्राचीन मूळ असून पाली साहित्य हे केवळ प्राचीन ज्ञानपर्व नव्हे, तर जगातील सर्वात प्राचीन आणि सशक्त स्त्रीवादी साहित्याचे जिवंत साक्षीदार आहे.” असे अधोरेखित केले.
सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल श्रीकांत तळवटकर यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक सयाजी वाघमारे, सुमेध जाधव, पत्रकार-साहित्यिक गुणाजी काजीर्डेकर, धम्मलिपी तज्ज्ञ छाया पाटील, जेष्ठ साहित्यिक, कवी, बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, अभिनेत्री सावित्री मेधातुल आणि संतोष खामगांवकर व आज विविध स्तरावर कार्यरत असणारे त्यांचे विद्यार्थी, यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच ज्यांच्या पाठबळामुळे प्रा. विजय मोहिते व्याख्यानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले अश्या त्यांच्या सुविद्य पत्नी वृषाली विजय मोहिते व मुदिता विजय मोहिते व मेत्ता विजय मोहिते या दोन सुकन्या ही उपस्थित होत्या. त्यातील मेत्ता विजय मोहिते हिने “पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या ग्रंथाचे मुखपृष्ठ डिझाइन बनवले आहे. सरतेशेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून जेष्ठ साहित्यिक अँड. धम्मकिरण चन्ने यांनी कार्यक्रमाची सांगता केली.













