मुंबई दि. ६ (रामदास धो. गमरे) “बुद्ध म्हणजे ज्ञान व सर्वात उच्च पदाची अवस्था होय, जसे बोलतात तसे चालतात आणि जसे चालतात तसे बोलतात म्हणजे तथागत गौतम बुद्ध. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सर्वप्रथम पाच भिक्खुंना ज्ञान देत धम्मदेसना दिली आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार केला मी तुम्हाला धम्म देत आहे तो तुम्हाला पटला तरच त्यामार्गावर चाला त्यात तुमचंच कल्याण आहे, मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे असा संदेश दिला, चाळीस वर्षे धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यानंतर सम्राट अशोकाने चौऱ्यांऐशी हजार स्तूप बांधून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला धम्मदिक्षा देत असताना २२ प्रतिज्ञा दिल्या आणि तळागाळातील माणसाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून मानवतेचा संदेश दिला, बाबासाहेबांनी प्रथम बुद्धांना गुरू मानले ते क्षत्रिय होते, तसेच संत कबीराना गुरू मानले जे जन्माने हिंदू आणि त्यांचे पालनपोषण नीरू आणि नीमा या जुलाहा (विणकर) मुस्लिम कुटुंबाने केले, कबीर यांनी जात-पात आणि धार्मिक अंधश्रद्धांवर कडाडून टीका केली आणि सर्व मानवजातीच्या एकतेचा संदेश दिला, तसेच माळी समाजातील महात्मा फुलेंना गुरू मानले म्हणजे बाबासाहेबांनी जातीपातीचा विचार न करता जातीपातीला मूठमाती दिली व विज्ञानवादी दृष्टीकोन आणि मानवतावादी विचाराने संपन्न महामानवांना बाबासाहेबांनी गुरू मानलं ज्यांच्या गुणवंत, शीलवंत, नीतीवंत चारित्र्याचा सुगंध आज ही दरवळतो आहे म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात चित्राची पूजा करण्यापेक्षा चरित्राची पूजा करा” असे प्रतिपादन बौद्धाचार्य अशोक पवार यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या वर्षावास मालिकेचे चौदावे पुष्प गुंफत “बौद्ध धम्म आणि त्याचे प्रचारक” या विषयावर बोलत असताना केले.






बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर मंगेश पवार यांनी प्रस्ताविक सादर केले, प्रस्ताविक सादर करते वेळी बौद्धाचार्य अशोक पवार यांची सभागृहाला ओळख करून दिली, सोबतच स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्या यांनी सढळ हस्ते धम्मदान करीत आपली मदत ऑक्टोबर पर्यंत जमा करावी असे आवाहन केले, तसेच श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींचे आभार मानले तसेच ज्यांनी धम्मदान स्वरूपात भोजनदान दिले व परिश्रम घेऊन सहकार्य केले त्यासर्वांचे ही आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी “जगात पहिले महायुद्ध झाले त्याची झळ आजही जग सोसत आहे, दुसऱ्या महायुद्धात जपानची राखरांगोळी करण्यात त्याची झळ आपल्या देशाला लागली, त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपल्या तिन्ही दलाच्या सेनाप्रमुखांना बोलवून ७ सप्टेंबर १९७२ रोजी अणुबॉम्ब बनवायला व चाचणी करण्यास मान्यता दिली त्या चाचणीचे सांकेतिक नाव लाफिंग बुद्धा म्हणजेच बुद्ध हसला असे होते, अण्वस्त्र यंत्रणा असल्याने कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने बघू शकलं नाही भारताने हे नाव शांती प्रस्थापित होण्यासाठी ठेवले होते कारण भारताला युद्ध नको बुद्ध हवा विश्वशांती, समता हवी आहे, ज्या ज्या देशात बौद्ध धम्म आहे ते देश सुजलाम सुफलाम आहेत असे नमूद केले तसेच “बौद्ध धम्म आणि त्याचे प्रचारक” या विषयावर बोलत असताना बौद्धाचार्य अशोक देवराम पवार अत्यंत मुद्देसूद मांडणी करत सौंदहरणास सर्वांना समजेल अश्या साध्या सोप्या परंतु तितक्याच प्रभावी पद्धतीने आपला विषय पटवून दिला याबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस मंगलकामना दिल्या.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, चंद्रमनी तांबे, विठ्ठल जाधव, श्रीधर जाधव, अतुल साळवी, पांडुरंग साळवी (आदर्श व्यक्तिमत्त्व), राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, तुकाराम घाडगे, मंगेश पवार, सी. एम. कासारे, कुशीराम शिर्के, पांडुरंग मोरे, बौद्धाचार्य महेश साळवी, महिला मंडळाच्या अंजलीताई मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे, बौद्धाचार्य अशोक पवार व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.











