ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.






डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ मानले जातात. ते केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नसून, सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘हमाल पंचायती’ची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.













