गुहागर तालुक्यातील प्रतिभावंत पवार पिता-कन्या जोडी पिता रविंद्र पवार समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

0

गुहागर: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र रविंद्र रोहिणी अनंत पवार यांना दिशा महाराष्ट्राची चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, सानपाडा, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार – २०२५ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रविंद्र रोहिणी अनंत पवार यांनी २००० ते २००२ या काळात गुहागर-चिपळूण परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सेवाभावी संस्थांमध्ये स्मरणशक्ती वाढ, व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विषयांवर तब्बल ८० विनामूल्य व्याख्यानं देत समाजकार्याची मोलाची परंपरा जपली. सध्या ते मराठी मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असून झी मराठीवरील लोकप्रिय ‘शिवा’ व वहिणीसाहेब, परिजात, देवयानी, जतोस्तुते, चाहूल, राधा प्रेम रंगी झाली, कुंकू टिकली, टॅटू, लागिर झाल जी, मिसेस मुख्यमंत्री, संभाजी, शोध अस्तित्वाचा, स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, घरोघरी मातीच्या चुली, ठरलं तर मग अशा अनेक मालिकांचे निर्मिती प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सुपुत्री कु. पारमी दिपाली रविंद्र पवार (इयत्ता ८ वी) ही देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अल्पवयातच आपली ओळख निर्माण करत आहे. मुंबईमध्ये झालेल्या ‘भीमा तुम्हा वंदना’ या कार्यक्रमात पारमीने निवेदिका म्हणून काम पाहिले आणि तिच्या संयत, प्रभावी सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकले. तिच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून शालेय कार्यक्रमांमधून निवेदनाची सुरुवात करणाऱ्या पारमीने पुढे ‘हसत खेळत प्रबोधन करूया’ आणि ‘आपणच होम मिनिस्टर होऊया’ या महिला जागरूकता कार्यक्रमांमध्येही सूत्रसंचालनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

पिता-पुत्रीच्या या अत्युत्तम प्रवासात आणखी एक मानाचा तुरा लवकरच जोडला जाणार आहे २० ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे संध्याकाळी ७ वाजता सृष्टी फाऊंडेशन आयोजित हिंदी-मराठी गीतांच्या विशेष कार्यक्रमात पारमी पवार निवेदिका म्हणून काम पाहणार आहे. तळवली गावातील ही पिता-पुत्री जोडी त्यांच्या कर्तृत्वाने रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढवत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.