राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले व्यावसायिक समीर पाटील यांच्याविरोधात माजी आमदार व शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्याकडून सुरू असलेल्या आरोपांच्या सरबत्तीला पुणे न्यायालयाने ‘ब्रेक’ लावला आहे.समीर पाटील यांच्याविरोधात कोणतेही मानहानीकारक विधान अथवा टिप्पणी करू नका, असे आदेश न्यायालयाने धंगेकर यांना दिले आहेत. समीर पाटील यांनी धंगेकरांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.






वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघल यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात परदेशात पळून गेलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ प्रकरणात धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्या वेळी त्यांनी समीर पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.
समीर पाटील यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई झाली असून, त्यांचे गुंडांशी साटेलोटे असल्याचा आरोप धंगेकर यांनी काही छायाचित्रांच्या आधारे केला होता. त्यावर समीर पाटील यांनी धंगेकरांना ५० कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवून न्यायालयात धाव घेतली होती.
समीर पाटील यांच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतेही बदनामीकारक वक्तव्य अथवा टिप्पणी करण्यास धंगेकरांना न्यायालयाने मनाई केली आहे.













