पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध पेटले आहे. कोंढवा-कात्रज परिसरातील खडी मशीनजवळील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपासमोर शनिवारी दुपारी गणेश किसन काळे (वय 30, रा. येवलेवाडी) याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. गणेश काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे.






खून प्रकरणाच्या तपासात समोर आले कि, गणेश काळे याला कोंढवा पोलिसांनी त्याच्या हत्येच्या केवळ 4 दिवस आधी, म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता बेकायदेशीर देशी दारू विक्रीच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलीस अंमलदार प्रशांत लक्ष्मण खाडे यांनी दारू विक्रीप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिस तपासात गणेश किसन काळे (वय 30, रा. येवलेवाडी) हा टँगो कंपनीच्या 61 देशी दारूच्या बाटल्या (एकूण ₹2,440 किमतीच्या) विकतांना दिसून आला होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ₹8,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
दारू विक्रीप्रकरणी प्रशांत खाडे, राजपूत, पटेल आणि शेख हे पोलीस 28 ऑक्टोंबर रोजी दुपारी खडी मशीन भागात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार राजपूत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येवलेवाडी येथील शिवकृपा बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विकत आहे. त्यानंतर पोलिसांनी गणेशला रंगेहाथ पकडले होते. दारू विक्रीच्या या प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर त्याची हत्या झाली आहे.













