पंकजा मुंडे चेअरमन असलेला आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री झाली आहे. ओंकार कारखान्यासोबत हा व्यवहार झाला असून ५०० कोटींचा कारखाना केवळ १३१ कोटींना विक्री केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या कारखान्याचे कायदेशीर सल्लागार राहिलेले अॅड. परमेश्वर गित्ते यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेलं खरेदीखत उजेडात आणलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या जमिनीवर स्व. गोपीनाथराव मुंडे यांचं स्मारक उभं आहे, त्या गोपीनाथगडाच्या उत्तरेची जागाही विक्री करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पंकजा मुंडे यांनी मात्र मौन बाळगल्याचं दिसतंय….






एका यूट्युब चॅनेलशी बोलतना ॲड. परमेश्वर गित्ते सांगतात की, वैद्यनाथ साखर कारखान्याची किंमत ५०० कोटी रुपये आहे. तरीही विक्री व्यवहार हा १३१ कोटींमध्ये पार पडला. कारखान्याकडे असलेली जमीन, शुगर प्लांट, डिस्टिलरी प्लांट, इथेनॉल प्लांट, बगॅस प्लांट, वाहनं हे सगळं ओंकार साखर कारखान्याच्या मालकीचं झालं आहे.
गोपीनाथ गडाची जमीन विक्री
अॅड. परमेश्वर गित्ते सांगतात, गट क्रमांक ९४ मध्ये शासकीय गायरान आहे. ही जागा पांगरी ग्रामपंचायतीने स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रेमापोटी दिली होती. लोकांनी स्वतःची घर उठवून स्थलांतर केलं होतं. याच गायरान जमिनीमध्ये आणि त्याच्या लगत गोपीनाथ गड आहे. या परिसरातील काही जागा ओंकार कारखान्याला विक्री करण्यात आलेली आहे.
अॅड. गित्ते म्हणाले, गट क्रमांक ९४चं खरेदीखत झालेलं नाही. कदाचित गायरान असल्यामुळे विक्री झालेली नसेल किंवा स्व. गोपीनाथराव मुंडे यांची समाधी असल्यामुळे ही जागा विक्री केली नसेल. परंतु गोपीनाथ गडाकडे असलेली गडाच्या उत्तरेकडील जागा विक्री झाली आहे. ही जमीन वैद्यनाथ कारखान्याने ९९ वर्षांच्या करारावर वैद्यनाथ प्रतिष्ठान अर्थात गडासाठी दिलेली होती. त्यातील जमीन विक्री झाली आहे. म्हणजे प्रत्यक्ष गड असलेली जागा सोडली तर इतर जागेची ओंकार कारखान्याला विक्री झाली आहे. ही बाब स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी धक्कादायक आहे.
कारखान्याकडे असलेल्या कर्जाचं काय?
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज असून शेतकरी, कामगार वर्गाचं देणंदेखील आहे. अॅड. गित्ते सांगतात, वैद्यनाथ बँक, द्वारकादास बँक, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक अशा साधारण १३ ते १४ बँकांचं कारखान्याकडे शंभर कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. या कर्जाची वसुली झाली की नाही, याबाबत खरेदीखतामध्ये स्पष्टता नाही.
यासह महाराष्ट्र शासनाचा जीएसटी कर ४५ कोटी, राज्य शासनाचं मोठ्या प्रमाणावर भागभांडवल, राज्य शासनाचं कर्ज, शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे, कामगारांचे पैसे, ठेकेदारांचे पैसे देणं बाकी आहे. हे सगळं साधारण शंभर कोटी रुपये कारखान्याकडे बाकी असल्याचं गित्ते यांनी सांगितलं आहे. मात्र हा प्रकार उघड होऊन चार दिवस लोटले तरी पंकजा मुंडे यांनी आपली बाजू मांडलेली नाही.











