राज्य सरकारने आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा उपसमिती नेमली होती, तशीच ओबीसींच्या आरक्षणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी OBC उपसमिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, या उपसमितीची मुंबईत बैठक झाली. यात छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झाल्या. पंकजा मुंडे यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेताना, ‘ओबीसींवर अन्याय झाला नाही पाहिजे. मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र दिले जाऊ नये, यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे,’ अशी मागणी केली.






मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणावर विरोध कायम ठेवला आहे. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. अध्यादेशामधील मराठा या शब्दावर त्यांनी नाराजी बोलून दाखवली. मराठा समाजासाठी काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचा थेट फटका ओबीसी आरक्षणाला बसत असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत ओबीसींना मिळत असलेल्या योजनांचा लाभ, त्यासाठी उपलब्ध होत असलेला निधी, शिक्षणातील ओबीसींना मिळत असलेल्या आर्थिक लाभ यावर चर्चा झाली. ओबीसींमध्ये अनेक जातींचा समावेश आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्यायाची भावना बळावल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याया होणार नाही, यावर चर्चा झाल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
अवैध नोंदी दिल्या जाऊ नये, यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी. तर, मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये, यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. हैदराबाद गॅजेटियरचा विषय आल्यावर बंजारा समाज देखील आरक्षण मागतोय, अशात संवैधानिक चौकटीत सर्व निर्णय घेतले जावेत. मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आहे, ओबीसींवर अन्याय होणार नाही असं ते म्हणाले, अशीही माहिती पंकजा यांनी दिली.
ओबीसींना मिळणाऱ्या निधी संदर्भात अन्याय झाला नाही पाहिजे. राज्यात गेली अनेक दशकं मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे, आणखी लोकं ओबीसीत घेण्याचं स्वागत होत नाही. मात्र, कुणबी नोंदणीसंदर्भात आमचं कोणतंही म्हणणं नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना, पंकजा मुंडे म्हणाल्या, “छगन भुजबळ यांच्या अनुभवाचे बोल आहेत.त्याला नाराजी म्हणता येणार नाही.” पांरपारिक कुणबी प्रमाणपत्रांना विरोध नाही. मात्र यातून बोगस दाखल गेल्यास ओबीसींवर अन्याय होईल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.











