उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाच्या एक दिवस आधीया 2 पक्षांची महत्त्वाची घोषणा; बहुमताचा आकडा खाली कोणाला फटका बसणार?

0

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आता केवळ एक दिवस राहिलेला आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीनं दक्षिणेतील उमेदवार दिल्यानं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे. एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे विजयासाठी आवश्यक मतं आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांचं मताधिक्क्य किती असणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीला अवघे काही तास राहिलेले असताना दोन मोठ्या राजकीय पक्षांनी मोठी घोषणा केली आहे.

चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वाखालील भारत राष्ट्र समिती आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्त्वातील बीजू जनता दल यांनी मतदानापासून दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही आघाडीचा भाग नाहीत. एनडीए आणि इंडिया आघाडीपासून अंतर राखून असणारे दोन्ही पक्ष उद्या मतदानात सहभागी होणार नाहीत. तेलंगणात सध्याच्या घडीला युरियाची कमतरता आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. याच कारणास्तव मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव यांनी सोमवारी दिली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

भाजप आणि काँग्रेस युरियाचा मुद्दा सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप रामा राव यांनी केला. ‘युरियाचा पुरवठा अतिशय कमी आहे. युरियासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या आहेत. त्यांच्यात हाणामारी होत आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नोटाचा पर्याय असता, तर आम्ही तोच निवडला असता. पण तसा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही मतदानच करणार नाही,’ असं रामा राव म्हणाले.

बीजू जनता दलाचे नेते सस्मित पात्रा यांनीही त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ओडिशातील साडे चार कोटी जनता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही जनता आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. आमचे पक्षाध्यक्ष नवीन पटनायक यांनी वरिष्ठ नेते, राजकीय विषयांबद्दलची समिती आणि खासदारांशी सल्लामसलत करुन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही एनडीए आणि इंडिया आघाडीपासून समान अंतर राखून आहोत, असं पात्रा यांनी सांगितलं.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

लोकसभेत बीजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समितीचा एकही खासदार नाही. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. राज्यसभेत बीजू जनता दलाचे ७ खासदार आहेत. तर भारत राष्ट्र समितीचे ४ खासदार आहेत. हे ११ खासदार उद्या मतदान करणार नाहीत. त्यामुळे बहुमताचा आकडा खाली येईल. त्यामुळे याचा फायदा एनडीएचे उमेदवार असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांना होईल.