‘सांगली’चा तिढा सुटण्याची शक्यता लवकरच निघणार तोडगा? ठाकरेंची सौम्य भूमिका; चर्चा करण्यास तयार 

0

सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेतृत्वाने अखेर ताठर भूमिका सोडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्‍वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे दिल्लीतील चर्चेत ठरले आहे. आमदार विश्‍वजित कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

दिल्लीत काल इंडिया आघाडीचा मोर्चा निघाला. त्यात सांगलीसह भिवंडी आणि मुंबईतील तीन वादग्रस्त जागांवर चर्चा अपेक्षित होती. सकाळी प्रदेश काँग्रेसचे नेते आणि शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. शिवसेनेकडून सांगलीवरील दावा सोडला जाणार नाही, असा सकाळी निरोप देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांनीही आम्ही सांगली लढतोय, मैत्रीपूर्ण लढत करू, असा निरोप शिवसेनेला दिला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेची तयारी दर्शवली आहे.

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आणि नवी उभारी देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला आज दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली, हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे.’’