भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रारुप प्रभागरचना बनवताना महायुती सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला हेतू पुरस्कर प्रक्रियेपासून वेगळे ठेवल्याने सध्या शहरांमध्ये या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. पुणे महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतिष्ठेची असली तरी सुद्धा या महानगरपालिकेमध्ये भाजपने आगामी निवडणुकीत स्वबळावर 110 जागा जिंकण्याची रणनीती आखली असून राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मुळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडे असतानाही पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका दोन्ही महापालिकांच्या आराखड्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाला बेरजेत न धरता प्रभाग रचना बनवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागा मार्फत पुढील कार्यवाही करताना यामध्ये काही बदल होणार की नाही अशी खमंग चर्चा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागल्या आहेत.
राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कायमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेवर वरचष्मा राहिला आहे. पुणे महापालिकेचा राजकीय इतिहास पाहता आजतागायत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अल्पकालीन शिवसेना या सत्ताधारी पक्षांनीही प्रभाग रचनेमध्ये आपला हस्तक्षेप दाखवला आहेच यंदाही त्याला भाजपा अपवाद नाही. भाजपने प्रारूप रचना तयार करताना फक्त भाजपाला अनुकूल असा आराखडा तयार केल्याचे समजते. त्यामुळेच पुणे महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे किमान 110 नगरसेवक विजय करण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आली आहे. महापालिकेने प्रारूप प्रभागरचना नगरविकास विभागात जमा केली असून ही रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. महायुतीत ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना हे दोन्ही घटक पक्ष असून, त्यांना शहरातील रचनेत फारसे विश्वासात घेतले नसल्याने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही थेट नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपने ही रचना तयार करताना स्वबळावर निवडणूक लढवली गेली, तरीही 110 जागा विजयी करण्याचे नियोजन केले आहे. सत्ताधारी पक्षातील सुमारे 100 नगरसेवकांचा पाठपुरावा सुरू असताना निर्णय प्रक्रियेतील नेत्यांकडून मात्र कोणताही बदल न करता जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे; परंतु पुणे महापालिकेवरती पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच वरचष्मा राखण्यासाठी स्थानिक नेत्यांनाही दुखवायला निर्णय प्रक्रियेतील पदाधिकाऱ्यांनी मागेपुढे पाहिलेले नाही. पूर्ण शहरासाठी एक वेगळी रणनीती आखत अधिकाधिक प्रभागांत चारही सदस्य निवडून आणण्यासाठी ‘मतां’चा समतोल साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेने नगरविकास विभागाला प्रारूप प्रभागरचना सादर केली आहे. नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येत असल्याने पुण्याच्या रचनेत शिवसेनेला अनुकूल असे बदल होतील, असा दावा शिवसेनेचे स्थानिक नेते करीत आहेत. मुळात पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ लक्षात घेता राजकीय प्रभावाने या रचनेत कुठलाही मोठा बदल करणे अवघड आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बदल काही घडणार नाहीत असा दावा भाजपचे निर्णय प्रक्रियेतील नेते ठामपणे करत आहेत. सादर झालेल्या आराखड्यामध्ये आपल्या मर्जीप्रमाणे बदल केले नसल्याने नगरविकास विभागामध्ये बदल करण्यासाठी महायुतीतील स्थानिक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नगरविकास विभागाकडून आज हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे अपेक्षित आहे. नगरविकास विभागाला या आराखड्यावर हात फिरवण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी मिळाला आहे. तशी तजवीज महापालिका प्रशासनाने करून ठेवली होती. त्यामुळे नगरविकास विभाग पुण्यातील शिवसैनिकांना साथ देणार की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच पुण्यातील प्रभाग रचनेवर पकड राहणार हे प्रभाग रचना हरकती सूचनेसाठी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचना करताना पुण्यात ‘राष्ट्रवादी’ने मर्यादित आणि भाजपने जिल्हा परिषदेत फारसे लक्ष घातलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांनी आपापले प्राबल्य असलेले स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत हद्दवाढ नसल्याने तेथील बहुतांश प्रभाग रचना 2017 च्या धर्तीवरच केली आहे. पुणे महापालिकेत मात्र 2017 नंतर 32 गावांचा समावेश झाल्याने प्रारूप प्रभाग रचनेतील सर्वाधिक बदल पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये झाले आहेत. ‘महायुती’ घटकपक्षांनी कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभागरचनेत कितपत लक्ष घालायचे, याचा ‘फॉर्म्युला’ राज्य पातळीवरच ठरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तरी पुणे महापालिकेतील प्रभागरचनेत मोठे बदल झाल्याने ‘महायुती’तील स्थानिक नेत्यांमध्ये नव्याने नाराजीचे वारे आहेत.