बारामतीतील मतदानानंतर शरद पवारांबद्दल अजित पवारांची भाषा सॉफ्ट का झाली? या आहेत मोठ्या घटना

0

‘पवार साहेब आमचं दैवत आहे. मी त्यांचा मलगा असतो तर मला संधी मिळाली असती.’ हे वाक्य आहे अजित पवारांचं. राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर सभांमधून पवारांना टार्गेट करणाऱ्या अजितदादांची पवारांबाबतची भाषा आता सॉफ्ट झाली आहे. फुटीनंतर पवारांना आमचे वरिष्ठ म्हणून संबोधणारे अजितदादा आता शरद पवारांना पुन्हा आमचं दैवत म्हणत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर अजितदादांची पवारांबाबतची भाषा का बदलली, बारामतीच्या निवडणुकीनंतर नेमक्या कुठल्या गोष्टी घटल्या, हे सगळं समजावून घेऊयात या मुद्यांमध्ये…. 

नुकताच बारामतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांची जोरदार भाषणं झाली. सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळाला. निवडणुकीच्या दिवशी मात्र सर्व लक्ष रोहित पवार यांनी खेचून घेतलं. अजित पवार गटाकडून अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे दत्ता भरणे यांचा व्हिडीओ देखील व्हायरला झाला होता. महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मतदारसंघ पिंजून काढणारे अजित पवार निवडणुकीच्या दिवशी मात्र मतदान केल्यानंतर घरीच बसून होते. अजित पवार संध्याकाळी थेट सभेला निघून गेले. मतदानाचा दिवस पार पडल्यानंतर अजित पवारांची भाषा काहीशी बदललेली दिसून आली. याला प्रामुख्याने या घटना कारणीभूत असल्याचं म्हटले जात आहे.

पहिली घटना : अजितदादांच्या घरी चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्यं

सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरु झाल्यानंतर महायुतीचे नेते देखील प्रचारात उतरले. चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवारांच्या घरी देखील भेट दिली. एका पत्रकार परिषदेतील चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यामुळे मात्र अजितदादांच्या प्रचाराला चांगलाच फटका बसला. एका पत्रकार परिषदेमध्ये ‘बारामतीमधून शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे’ असं स्टेटमेंट चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक परिणाम पुढच्या काळात दिसून आले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शरद पवार गटाकडून या वक्तव्याचा आधार घेत सभांमधून भाजपबरोबरच अजित पवारांना लक्ष करण्यात आलं. रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आजच अजित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत थेट नाराजी देखील व्यक्त केली. ‘चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य अत्यंत चुकीचं होतं’ असं अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर आम्ही त्यांना बारामतीमध्ये प्रचाराला येऊ नका असं सांगितल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं.

दुसरी घटना : सख्खे बंधू श्रीनिवास बापू यांची शरद पवारांची साथ

एकीकडे पवार विरुद्ध पवार लढत होत असताना कुटुंब कोणासोबत राहणार हा सगळा प्रश्न होता. रोहित पवार यांचं कुटुंब हे आधिच शरद पवरांसोबत होतं. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी जाहीरपणे शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. श्रीनिवास पवार यांनी तर ‘विधानसभेच्या निवडणुकीला अजित पवार मला बिनमिश्याचा बघायचा आहे’ असं स्टेटमेंट त्यांनी केलं. त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरल्याचं दिसून आलं. त्यामुळे कुटुंबात देखील अजित पवार एकटे पडल्याचं समोर आलं. त्याचा मेसेज लोकांमध्ये देखील वेगळ्या प्रकारे गेला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

तिसरी घटना: पंतप्रधान मोदींचा ‘भटकती आत्मा’ जिव्हारी

मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली. यावेळी मोदींनी नाव न घेता पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. मोदींच्या या वक्तव्याचे तीव्र पडसात उमटले. बारामतीकरांना देखील पवारांचा असा उल्लेख पटला नाही. याचा मोठा फटका अजित पवारांना बसला. अजित पवारांनी देखील मोदींच्या वक्तव्याचा समर्थन केलं नाही. ‘मोदी असं का म्हणाले हे मी विचारीन’ असं वक्तव्य अजित पवारांनी नंतर केलं होतं. मोदींच्या वक्तव्यामुळे देखील मोठा फरक अजित पवारांच्या प्रचारामध्ये दिसून आलं.

चौथी घटना : मतदानाच्या दिवशी मीडियाचा फोकस रोहित पवारांकडे

बारामतीच्या मतदानाच्या दिवशी मीडियाचा सगळा फोकस स्वतःकडे ठेवण्यात रोहित पवार आघाडीवर होते. अजित पवारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्याचबरोबर अनेक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यातच पीडीसीसी बँक रात्री उशीरा सुरु का होती असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला. हे सगळं सुरु असताना दादांच्या जवळचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये दत्ता भरणे पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं होतं. या व्हिडीओमुळे देखील मोठा फटका अजित पवारांना बसला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पाचवी घटना: कोणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो

बारामतीमधून ज्या विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना लीड मिळण्याची अपेक्षा आहे त्या खडकवासला मतदारसंघामध्ये मतदानात घट झाल्याचं समोर आलं. खडकवासला हा भाजपचा बालेकिल्ला आहे. परंतु या मतदारसंघामध्ये मतदान कमी झाल्याने दादांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे भोरमधून मतदानात वाढ झाली आहे. भोरमधील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंना पाठींबा दिला आहे. त्यामुळे भोरमधील मतदान वाढल्याने त्याचा फायदा हा सुप्रिया सुळे यांना होण्याची शक्यता आहे.

९ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपसोबत गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही या पवारांच्या वक्तव्यावर देखील अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली. निलेश लंके यांना पुन्हा पक्षात घेतल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. त्याचबरोबर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं देखील अजित पवार म्हणाले. अनेक भाषणांमधून पवारांना सभा घ्यायला न लावता त्यांच्या तब्येतेची काळजी पवार गटातील नेत्यांनी घ्यायला हवी असं देखील पवार म्हणाले.

अजित पवारांच्या शरद पवारांबाबतच्या या सॉफ्ट कॉर्नरमुळे आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबतचा प्रश्न जेव्हा पवारांना विचारण्यात आला तेव्हा याबाबत अजित पवारांनाच विचारा असं पवार म्हणाले. त्यामुळे येत्या काळात नेमक्या कुठल्या घडामोडी घडतात हे पाहावं लागेल, दुसरीकडे चार जूनच्या निकालानंतर अनेक घडामोडी होण्याच्या शक्यता देखील नाकारता येत नाहीत.