मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) “फोटोफ्रेममध्ये शांत, ध्यानमग्न अवस्थेत असलेले तथागत गौतम बुद्ध आपण जसेच्या तसे स्वीकारलेत परंतु खरे बुद्ध व त्यांचे विचार आपल्यापासून व आपल्या नवीन पिढीपासूच कोसो दूर राहिले आहेत किंबहुना आपण ते समजून घेतलेच नाही त्यामुळे येणाऱ्या पिढ्यान बुद्ध समजावून सांगण्यात आपण कमी पडतोय, चित्रकाराने आपल्या कल्पनाशक्तीने बुद्धाचे चित्र रेखाटले त्यामागे त्याचा दृष्टिकोन स्थल, काल, वेळ परत्वे वेगळा असू शकतो पण आपण कट्टरपंथी झाल्याने आपल्या मनात क्लेश, तिरस्कार निर्माण होतो व त्याचेच रूपांतरण पूढे संघर्षात होते आपण संधीमार्ग स्वीकारत नाही तडजोड करत नाही त्यामुळे बुद्ध विचारधारेपासून आपण दूर लोटले जात आहोत, बुद्ध हे विज्ञानवादी असून ते मोक्षदायी नसून मार्गदता आहेत त्यांनी आपल्या विचारधारेतून अनेकांना आदर्श माणूस घडवलं आहे, आपण ही त्याच विचारधारेचे पाईक होऊन तडजोड करायला शिकले पाहिजे, मुलांना उचशिक्षण देऊन त्यांना खऱ्या बुद्धांचा विचार त्यांना समजावून पुढील वाटचाल केली पाहिजे आता चळवळीची दिशा कालपरत्वे बदलली पाहिजे, आपली स्वप्ने ही मर्यादित न ठेवता मोठी स्वप्ने उराशी बाळगून आपण क्षेत्रात अग्रेसर झालं पाहिजे” असे प्रतिपादन प्रा. प्रतीक पवार वर्षावास प्रवचन मालिकेचे प्रमुख व्याख्याते या नात्याने “आंबेडकरी चळवळीतील तरुणांची दिशा आणि धम्म” या विषयावर बोलत असता केले.
बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प सरसेनानी सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले प्रास्ताविक सादर करताना त्यांनी स्मारकाच्या निधी करता बौद्धाचार्य, बौद्धाचार्यांना त्यांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले सोबतच समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रामनेर शिबिरात ज्यांना सहभागी व्हायच आहे अश्यांनी नावनोंदणी करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात सभापती आनंदराज आंबेडकर यांनी “ज्यावेळी मी बार्टी येथील पीएचडी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न हाती घेऊन सोडवला त्यावेळी विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र आदी विभागातील ६०० विद्यार्थी होते परंतु कोकणातील एकही उमेदवार मला आढळला नाही त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कोकण पिछाडीवर आहे की काय असा विचार मनाला स्पर्शून जातो, आपण फक्त पीटी केसचा विचार करतो माझ्यानंतर माझा मुलगा माझ्या जागेवर कामाला लागेल इतकाच संकुचित विचार करीत आपण मुलाच्या भविष्याचा विचार न करता त्याचे भविष्य सरळसरळ अंधारात लोटत आहोत परंतु आता व्यापक विचार करीत आपल्या मुलाला उच्चशिक्षित करून उच्चपदावर पाठवल पाहिजे ही मानसिकता आपल्यात निर्माण झाली पाहिजे, विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, खानदेश, माणदेश आदी विभागातील विद्यार्थी जशी प्रगती करत आहेत तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोकणातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे सर्व क्षेत्रात अग्रसेर होण्याकडे वाटचाल केली पाहिजे, विकसनशील अश्या सामंजस्य व मध्यम मार्गाचा अवलंब करून प्रगती केली पाहिजे” असे मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमनी तांबे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, प्रकाश करूळेकर, यशवंत कदम, सिद्धार्थ कांबळे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, चिंतामणी जाधव, महेंद्र पवार, सुशीलाताई जाधव, सिद्धार्थ कांबळे, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटच्या सत्रात दिवंगत बौद्धाचार्यांना साश्रु नयनांने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.