हडपसर विधानसभा मतदारसंघातील २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतमोजणीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार प्रशांत जगताप यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर, पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पुर्नगणनेचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार, हडपसर मतदारसंघातील २७ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्समधील मते २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान भोसरी येथे पुन्हा मोजली जाणार आहेत. ही माहिती सोमवारी अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली.
प्रशांत जगताप यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार चेतन तुपे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यात त्यांचा केवळ ७,१२२ मतांनी पराभव झाला. तुपे यांना १,३४,८१० मते, तर जगताप यांना १,२७,६८८ मते मिळाली होती. पक्षफुटीनंतर दोन्ही गटांमध्ये थेट लढत झाली होती.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, अनेक मतदारसंघांमध्ये मतमोजणीत गडबडी झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. हडपसर हा त्यापैकी एक प्रमुख मतदारसंघ होता.
यापूर्वी, निवडणूक आयोगाने हडपसरमधील २७ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची फेरतपासणी करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्या मशिन्सचा वापर प्रत्यक्ष मतमोजणीऐवजी मॉक पोलसाठी करावा, असे निर्देश देण्यात आले होते. याला जगताप यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली आणि अखेर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून पुर्नगणनेचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप म्हणाले, “या पुनरगणनेत हडपसरमधील मतमोजणीमध्ये झालेल्या घोटाळ्याचे पडसाद नक्की उमटतील, अशी मला खात्री आहे.”