मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांची कल्याणकारी शिकवण गावागावात सर्वदूर पसरू लागली त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी प्रकांडपंडित, विद्वान, ब्राह्मण मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असत अश्याप्रकारे तथागत धम्माचा प्रचार व प्रसार करत पुढे पुढे जात होते, काही दिवसांनी प्रसेनजीत राजाच्या राज्यात पोहोचले त्यावेळी अनेक लोक त्यांना येऊन भेटू लागले व एकच खंत व्यक्त करू लागले की ‘भगवंत येथे अनेक अरहंत येऊन प्रवचन देऊन जातात परंतु आम्ही सांगतो तेच अंतिम सत्य असून तेच तुम्ही माना असे सांगतात तेव्हा भगवंत आम्ही यातून काय समजायचे ?’ तेव्हा त्यांचे शंकानिरसन करताना भगवंत म्हणतात की ‘एखादी गोष्ट ऐकली आहे म्हणून, परंपरेने मानली जात आहे म्हणून, आमच्या धर्मास अनुकूल आहे म्हणून, तर्कसंगत किंवा न्यायसंगत आहेत म्हणून, आमच्या मनाच्या अंतःकरणातील आहे म्हणून, सांगणारा व्यक्ती महत्वाचा, जेष्ठ किंवा पूजनीय आहे म्हणून स्वीकारू नका तर तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा कोणत्या गोष्टी योग्य आहेत निर्दोष आहेत व त्यानुसार चालल्याने आपले हित होईल, आपले कल्याण होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल त्याचा स्वीकार करा, सत्य अनुभवाने जाणले गेले आणि बघितले तर ते कुशल आहे यावर न थांबता त्यानुसार आचरण करा तेव्हा तुमचे कल्याण होईल’ म्हणून मानवी मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्ध होय” असे प्रतिपादन बौद्धाचार्य मनोज पवार यांनी वर्षावास प्रवचन मालिकेचे द्वितीय पुष्प गुंफत असताना “कलामसुत्त अर्थात मानव मुक्तीचा जाहीरनामा” या विषयावर बोलत असताना केले.






बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत चाललेल्या वर्षावास प्रवचन मालिकेद्वारे गावागावात, घराघरात धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्कार्य संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, सदर प्रवचन मालिकेचे दुसरे पुष्प कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली उपकार्याध्यक्ष अशोक कदम (पाटपन्हाळे, कदमवाडी) शाखा क्र. ११ या शाखेस आणि कदम परिवारास प्रथमच पूजेचा मान देऊन त्यांच्या शुभहस्ते ऑनलाइन Google Meet द्वारे सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सचिन मोहिते यांनी प्रभावी व लाघवी भाषाशैलीत केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी प्रास्ताविक सादर केले.
सदर कार्यक्रमास गाव व मुंबई या दोन्ही शाखांतील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच अशोक कदम व कदम परिवार, पाटपन्हाळे शाखा क्र. ११, आदर्श बौद्धाचार्य व्याख्याते मनोज पवार गुरुजी, शाखेचे आजी माजी विश्वस्त, आजी माजी कार्यकारिणी, सर्व उपासक, उपासिका व सर्व उपस्थितांचे आभार मानून अध्यक्ष दीपक मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.











