लोकमान्यांच्या विचारांचा दीप मालवला… दीपक टिळक यांचं पुण्यात निधन; विचारांचे एक युग संपले

0
22

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा विचारांचा वसा पुढे नेणारे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि केसरीचे संपादक डॉ. दीपक टिळक यांचं बुधवारी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.

लोकमान्यांच्या तेजस्वी परंपरेचा वारसा जपत, दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांत प्रदीर्घ योगदान दिलं. ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रनिष्ठ विचार अधिक व्यापक पसरवले.

डॉ. टिळक हे टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त होते. या ट्रस्टमार्फत दरवर्षी दिला जाणारा ‘टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ हा त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील मान्यवर व्यक्तींच्या हाती पोहोचला. त्यांच्या कार्यकाळात ट्रस्टने समाजोपयोगी अनेक उपक्रम हाती घेतले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

त्यांचे वडील जयंतराव टिळक हे गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व करणारे नेते होते. या परंपरेचा दीपक टिळक यांनी गौरवाने आणि जबाबदारीने वारसा म्हणून स्वीकार केला होता.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. टिळक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटले, “लोकमान्यांच्या विचारांची ज्योत ते अखेरपर्यंत प्रज्वलित ठेवत राहिले. दीपक टिळक यांचे जाणे म्हणजे टिळक परंपरेतील विचारवंतांचा प्रकाशदिप हरपल्यासारखं आहे.”

पुणे शहर, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र आणि राष्ट्रनिष्ठ विचारसरणी यांचं एक अविभाज्य प्रतीक आज काळाच्या पडद्याआड गेलं.