संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. यावेळी अत्यंत आक्रमक झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते. प्रविण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सरचिटणीस असून सक्रिय पदाधिकारी आहे. तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत.
प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. अशा खालच्या लेव्हलचे कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही. प्रविण गायकवाड यांच्याबाबत झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, आमचा संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा सरचिटणीस पदावर कार्यरत असलेला कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे. सुषमा अंधारेंना माहिती हवे की, कार्यकर्ते हे सगळे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात. पोलिसांनी संबंधितांवर योग्य कारवाई करायला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले होते.
उद्धव ठाकरे यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, पक्ष सांभाळता येत नाहीत. ठाकरेंना कार्यकर्त्यांना भेटायला वेळ नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आपला नेता अव्हेलेबल नाही तर कार्यकर्ता कोणाकडे जाणार ? भाजपमध्ये त्यांना सर्व अव्हेलेबल आहे. भाजपचे 137 आमदार आहेत. त्यामुळे हे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर तीव्र राजकीय पडसाद
प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या हल्ल्यासाठी भाजपला जबाबदार धरत जोरदार टीका केली. ‘संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशा रितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध’, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. याच प्रवीण दादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला तेही बहुजन वर्गाचे. त्रयस्थ यात मजा घेत आहेत. भावांनो! मला फक्त एक प्रश्न आहे, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलले होते, तो प्रशांत कोरटकर शिवयारांबद्दल बोलला होता तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.
प्रविण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे काय म्हणाला?
हल्ल्याच्या घटनेनंतर दीपक काटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असे नाव लावण्यात यावे कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय. छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते, त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील दीड ते 2 वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करतोय. संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केले होते आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला, असे दीपक काटे यांनी सांगितले.