महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या बैठकांचे सत्र हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे थांबले आहे. परंतु भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेते कामाला लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप याची चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नेते, भाजपचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यात भेटीगाठी सुरु झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि आमदार संजय शिरसाट दाखल झाले आहे. त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी निश्चित केलेली यादी तर बावनकुळे यांना गुलाबराव पाटील देत नाही ना? अशी चर्चा सुरु झाली आहे.
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना नेते बावनकुळेंकडे
शिवसेना नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवास्थानी आल्यानंतर भाजपचे नेते देखील आले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रविण दरेकरही बावनकुळे यांच्या भेटीला पोहचले आहेत. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ पोहोचलेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत गुलाबराव पाटील आणि आमदार संजय शिरसाट शिवसेनेचा मोर्चा सांभाळत आहेत. दुसरीकडे भरत गोगावले एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ठाणे येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत बैठक झाली.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हवे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकांना येत नाही. त्यामुळे महायुतीत बेबनाव असल्याची चर्चा आहे? त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, महायुतीत बिनसल काहीच नाही. मुख्यमंत्री दोन दिवस आजारी आहेत. परंतु विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला गेला आहे. एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे नरेंद्र मोदी जो निर्णय होतील तो मला मान्य आहे. आगामी काळात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पाहता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी आमची इच्छा आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.