बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तिचा आगामी ‘माँ’ हा एक हॉरर चित्रपट असून 27 जून 2025 रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘शैतान’च्या प्रोड्यूसरने हा चित्रपट बनवला असून काजोल एका नव्या आणि थरारक भूमिकेत दिसणार आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये फक्त सहा चित्रपटांमध्ये झळकलेली काजोल आता एका हटके भूमिकेसह परतते आहे.
पण या चित्रपटाला थेट टक्कर देण्यासाठी येतेय ‘निकिता रॉय’, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. हा सुद्धा एक हॉरर चित्रपट आहे आणि तो देखील 27 जून 2025 रोजीच प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी, एकाच जॉनरमधून (हॉरर) सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार असल्यामुळे एक मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश होण्याची शक्यता आहे.
सोनाक्षीचा परफॉर्मन्स मागील काही प्रोजेक्ट्समध्ये लक्षणीय राहिला असून ‘धाकड’ सिरीजमधील तिचं काम विशेष गाजलं. ‘निकिता रॉय’चा ट्रेलरदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. यामध्ये परेश रावल यांच्यासारखे अनुभवी अभिनेते महत्त्वाच्या निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहेत.
हा योगायोग दुर्मिळ आहे, जिथे एकाच दिवशी दोन हॉरर फिल्म्स बॉलिवूडमधून एकमेकांसमोर उभ्या आहेत. काजोलची स्टार पॉवर निश्चितच अधिक असली, तरी सोनाक्षीचा चित्रपट सुद्धा कमकुवत नाही. आता कोणती ‘भिती’ भारी पडते आणि प्रेक्षक कोणत्या भीतीला स्वीकारतात हे 27 जूननंतरच कळेल!