साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूलाच्या (RoB) पुनर्बांधणी प्रकल्पाला दिवसाच्यावेळी वाहतूक बंदी आणि सततच्या पावसामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने आता रात्रीच्या वेळात काँक्रीटचे महत्त्वाचे काम सुरू केले आहे.
कोरेगाव पार्क ते पुणे कॅन्टोन्मेंट जोडणाऱ्या या पुलाचा जुना व अपुरेपणा लक्षात घेता नवीन पूल बांधण्यात येत असून, परिसरातील वाढती वाहतूक सुरळीत करण्याचा उद्देश आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी मार्च २०२६ हे पूर्णत्वाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
“दिवसाच्या वेळी वाहतुकीवरील निर्बंधांमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे आम्ही रात्री काँक्रीटचं काम सुरू केलं आहे. कोरेगाव पार्क बाजूला रॅम्पचे काम सुरू असून, गार्डर आणि बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (BARTI) बाजूच्या रॅम्पचे कामही प्रगतीपथावर आहे. मध्यवर्ती रॅम्पचे फॅब्रिकेशन साइटबाहेर सुरू आहे,” अशी माहिती अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, पीएमसी यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “सततच्या पावसामुळे काँक्रीटचे काम खंडित झाले होते. त्यामुळे हवामानाच्या स्थितीनुसार आमचा वेळापत्रक बदलत आहोत.”
रेल्वे प्रशासनाने डिसेंबर २०२३ मध्ये पूल कामासाठी ब्लॉक दिला होता. जानेवारी २०२४ मध्ये काम सुरू होऊन मेमध्ये ते पूर्ण झाले. त्यानंतर महापालिकेने उरलेला जुन्या पुलाचा भाग पाडला. या कामासाठी ५० तासांचा वाहतूक ब्लॉक मागवण्यात आला होता. तब्बल दोन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर परवानगी मिळाली.
जुलै २०२३ पासून पाडकामाला सुरुवात झाली होती आणि कोरेगाव पार्क बाजूचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. मात्र पुणे कॅन्टोन्मेंट बाजूचं काम अजूनही सुरू झालेलं नाही, कारण सेंट्रल रेल्वेकडून अद्याप ब्लॉक शेड्यूल मंजूर झालेला नाही.