एअर इंडियाचा आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १५% कपात करण्याचा निर्णय; सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल

0

गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडिया सतत चर्चेत राहिली आहे. अपघातानंतर सातत्याने विमाने तांत्रिक बिघाडाचा सामना करत असल्याने आता एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये १५ टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

कंपनीकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, ही कपात मुख्यतः सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाइड-बॉडी (जाड फ्युसेलाज) विमाने तपासणीसाठी करण्यात येत आहे. ही तात्पुरती कपात २० जूनपासून अंमलात आणली जाणार आहे.

१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडिया फ्लाइट AI171 काही मिनिटांतच अपघातग्रस्त झालं. या अपघातात २९७ लोकांचा मृत्यू झाला होता. एकूण २४१ प्रवाशांमध्ये केवळ एकजणच बचावला.
या घटनेनंतर अनेक फ्लाइट्समध्ये तांत्रिक अडचणी आल्याचे समोर आले. परिणामी, कंपनीने अलिकडच्या आठवड्यात ८० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द केली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) बोईंग 787-8/9 विमाने तपासण्याचे आदेश दिले होते. ही तपासणी सध्या अर्ध्यावर पोहोचली आहे. त्याचबरोबर, बोईंग 777 प्रकारच्या विमानांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे.

एअर इंडियाने म्हटले आहे की, हा निर्णय प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन घेतला आहे. कंपनीने प्रवाशांना संपूर्ण रिफंड देण्याचं आश्वासन दिलं असून, पर्यायी उड्डाणांची सुविधाही दिली जाणार आहे.

कंपनीकडून सांगण्यात आलं की, “ही उपाययोजना तात्पुरती असून, लवकरच नियमित उड्डाणे पुन्हा सुरू केली जातील. AI171 अपघातातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे आम्ही दुःखी आहोत.”

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

या निर्णयामागे फक्त तांत्रिक कारणेच नाहीत, तर मिडल ईस्टमधील तणावाचेही संभाव्य परिणाम विचारात घेण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय सेवा काहीशी मर्यादित राहणार आहे.

या निर्णयामुळे काही प्रवाशांना असुविधा होऊ शकते, पण एअर इंडियाचा भर सध्या विमानांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता पुनर्संचयित करण्यावर आहे. प्रवाशांच्या जीवितास सुरक्षेचं कवच देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.