मांजरी खुर्द परिसरात गुन्हेगारी वाढ आणि सुविधांचा अभाव; नागरिक त्रस्त, पोलिस गप्प

0

मांजरी खुर्द परिसरातील नागरिक सध्या वाढत्या असुरक्षिततेमुळे चिंतेत आहेत. रात्री उशिरा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील वर्तन, धिंगाणा घालणारे युवक, वेगाने वाहने चालवून व्हिडिओ शूट करणारे गट, आणि निष्क्रिय पोलिस यंत्रणा यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.

स्थानिक रहिवासी, म्हणाल्या, “रोज रात्री दारू पिणारे टोळके, असभ्य वर्तन करणाऱ्या टोळ्या, मोठ्या आवाजात सायलेंसर फोडणारे तरुण, भरधाव बाईकवर व्हिडिओ शूट करणारे लोक दिसतात. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर दगडफेकही झाली. महिलांसाठी व लहान मुलांसाठी हा परिसर अत्यंत असुरक्षित झालाय. आम्हाला नियमित पोलीस गस्त आणि पुरेशा सुविधा – जसे की रस्त्यांवर लाईट्स आणि योग्य रस्ते – यांची तातडीने गरज आहे.”

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

“आम्हाला घर घेताना नद्याजवळ सुंदर रस्ता असेल असे सांगितले गेले होते, पण आत्ता तो रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे आणि एकही स्ट्रीट लाइट चालू नाही. आम्ही वारंवार तक्रारी केल्या तरी पोलिसांचा कोणताही वावर जाणवत नाही,” असेही नागरिकाने स्पष्ट केले.

स्वप्निल दांडे, VTP Cygnus सोसायटीतील रहिवासी, रात्री उशिरा कामावरून घरी येत असताना, त्यांच्यावर अज्ञात इसमाने दगडफेक केली. “हेल्मेट घातल्यामुळे मी वाचलो, नाहीतर डोळा किंवा डोक्याला गंभीर इजा झाली असती. त्या भागात लाईट नसल्याने मी दगडफेक कोण करत आहे ते ओळखू शकलो नाही.”

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

घटनेनंतर ते वाघोली पोलीस ठाण्यात गेले असता, पोलीसांनी केवळ “हा प्रकार जीवघेणा नाही, आणि आरोपी ओळखता आला नाही” म्हणून तक्रार घ्यायला नकार दिला.

दांडे म्हणाले, “ही घटना ५ दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर मी पोलिसांकडे गेलो, त्यांनी तक्रार घेण्याचे टाळले. त्यांनी म्हटले की असे लोक नेहमी येथे येतात आणि जातात. काही होणार नाही. मग आम्ही सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करायची?” “रात्री उशिरा बेकायदेशीर पार्ट्या, अश्लील कृत्ये, उशिरा सुरू असलेले बांधकाम यामुळे ध्वनीप्रदूषण, असुरक्षितता आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो,” असे दांडे म्हणाले.

नागरिकांची मागणी:

  • नियमित पोलीस गस्त
  • बंद पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती
  • अपुरे रस्ते, फुटपाथ्स यांचे नुतनीकरण
  • पोलिसांकडून तक्रारींवर तत्काळ कारवाई
अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता