उत्पादन क्षेत्राच्या घसरणीमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील भारताचा विकासदर ७.४ टक्क्यांपर्यंत घसरला असून पूर्ण वर्षाच्या विकासदराचीही ६.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. वार्षिक विकासदराची ही गेल्या चार वर्षांतील नीचांकी घसरण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) अर्थव्यवस्थेची वाढ ९.२ टक्के दराने झाली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आता ३.९ लाख कोटी अमेरिकी डॉलर म्हणजेच ३३०.६८ लाख कोटी रुपये एवढा झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य केले जाईल, असा अंदाज आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चीनशी तुलना करता या कॅलेंडर वर्षातील पहिल्या तीन महिन्यांतील त्यांचा आर्थिक विकास दर ५.४ टक्के एवढा राहिला आहे.
भारताचा आर्थिक विकास दर जानेवारी ते मार्चदरम्यान ७.४ टक्के होता तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान तो ६.४ टक्के एवढा होता. जुलै ते सप्टेंबर- २०२४ दरम्यान तो ५.६ टक्के तर एप्रिल ते जून तिमाहीत तो ६.५ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जानेवारी ते मार्चच्या तिमाहीत हा दर ८.४ टक्क्यांवर गेला. फेब्रुवारीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार हा दर संपूर्ण २०२४-२५ या वर्षासाठी ६.५ टक्के राहील असा अंदाज होता.
मागील वर्षी वेगाने वाढ
मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०२३-२४ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ३०१.२३ लाख कोटी रुपये होते तर या वर्षीच्या मार्च अखेरीस ते ३३०.६८ लाख कोटी रुपये असेल. ही वाढ ९.८ टक्के एवढ्या दराने झाली आहे. मागील आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्राची वाढ १२.३ टक्के दराने झाली होती. ती यावर्षी फक्त ४.५ टक्के दराने झाली आहे. देशाच्या एकंदरीत आर्थिक वाढीतही घसरण झाली आहे. मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राची वाढ ११.३ टक्के दराने झाली होती. ती या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ४.८ टक्के दराने झाली आहे.
‘कृषी’चे उत्पादन वाढले
मागील वर्षीच्या २.७ टक्के दराच्या तुलनेत यावर्षी कृषी क्षेत्राचे उत्पादन ४.६ टक्के एवढे वाढले आहे. यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत कृषी क्षेत्र ५.४ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत ते ०.९ टक्के दराने वाढले होते. मागील वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत बांधकाम क्षेत्र ८.७ टक्के दराने विस्तारले होते. ते यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत १०.८ टक्के वेगाने वाढले आहे.
अत्यावश्यक सेवांच्या वाढीस ब्रेक
वीज, नैसर्गिक वायू, पाणीपुरवठा आणि अन्य अत्यावश्यक सेवांचे क्षेत्र चौथ्या तिमाहीत ५.४ टक्के दराने वाढले. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते ८.८ टक्के दराने वाढले होते. व्यापार, हॉटेल, दळणवळण, दूरसंचार आदी सेवा क्षेत्राची वाढ यावर्षीच्या तिमाहीत ६ टक्के दराने झाली. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ती ६.२ टक्के होती. अर्थक्षेत्र आणि व्यावसायिक सेवा क्षेत्र यावर्षीच्या तिमाहीत ७.८ टक्के दराने वाढले. मागील वर्षीच्या याच तिमाहीत ते ९ टक्के दराने वाढले होते. सार्वजनिक सेवा संरक्षण आणि अन्य सेवा यांची वाढ मागच्या वेळेस म्हणजे ८.७ टक्के एवढीच राहिली.
‘जीडीपी’च्या वाढीचा वेग (प्रमाण टक्क्यांत) (प्रमाण टक्क्यांत)
जानेवारी-मार्च २०२५ – ७.४
ऑक्टोबर-डिसें. २०२४ – ६.४
जुलै-सप्टेंबर २०२४ – ५.६
एप्रिल-जून २०२४ – ६.५
वार्षिक विकासदर (२०२४-२५) – ६.५
(गेल्या ४ वर्षांतील नीचांकी)
वार्षिक विकासदर (२०२३-२४) – ९.२